राज्यातील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीचे आता ‘ईव्हीएम’ विरोधात मिशन
मुंबई (26 नोव्हेंबर 2024) : राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने यासाठी ईव्हीएम मशीनला दोष दिला जात आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून भारतीय जनता पक्षाने हा विजय मिळवला असल्याचा दावा काही नेते करत असताना दुसरीकडे आता महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात मिशन उघडण्याची तयारी केली आहे.
ईव्हीएमबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी राज्यभरातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलवण्यात आली. सर्व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईव्हीएम संदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी वकिलाची एक फौज उभी करण्याची सूचना देखील करण्यात आली.. या माध्यमातून कायदेशीर लढाई देखील लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी रोष व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने देखील राज्यभरातील पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलावली. या बैठकीत देखील ईव्हीएम मशीनच्या आकडेवारी बद्दल आपापल्या मतदारसंघातून अपडेट माहिती गोळा करण्याचे आदेश पराभूत उमेदवारांना देण्यात आले. आगामी काळात ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यामध्ये जन आंदोलन उभे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
ईव्हीएम गडगडीमुळेच पराभव : जितेंद्र आव्हाड
ईव्हीएम मशीनच्या गडबडीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन विरोधात आम्ही आजच नाही तर या आधी पासूनच बोलत असल्याचे जितेंद्र आवड यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड नक्कीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भातील वृत्त ‘दिव्य मराठी’ ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध झाले आहे.