भुसावळातील प्रा.डॉ.सुनील नेवे यांना राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक
भुसावळ (9 डिसेंबर 2024) : डॉ.भा.ल.भोळे विचार मंच नागपूर आणि राज्यशास्त्र व इतिहास विभाग, यशवंत महाविद्यालय, सेलू, जि.वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राजकीय व्यवस्था : निवडणूक प्रक्रिया आणि मतदार वर्तन’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र वर्धा येथे शनिवार, 7 रोजी झाले. राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धात सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद, ता.यावल येथील राज्यशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ.सुनील नेवे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. ‘समकालीन भारतीय लोकशाहीतील निवडणूक आयोगाची भूमिका’ या विषयावर डॉ.सुनील नेवे यांनी शोधनिबंध सादर केला.
यांची होती उपस्थिती
मान्यवरांच्या हस्ते डॉ.सुनील नेवे यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.भा.ल.भोळे विचार मंचाचे अध्यक्ष शेषकुमार एरलकर, सचिव डॉ.अशोक काळे, प्राचार्य डॉ.संदीप काळे, डॉ.अनंत रिंधे, डॉ.योगेश उगले (परतवाडा, यवतमाळ), डॉ.दीपाली घोगरे (पातूर, अकोला), कथन शहा (मुंबई), डॉ.प्रवीण भागडीकर राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.सुनील नेवे यांचा सत्कार करण्यात आला.
देशातील आयोग जगातील सर्वात उत्तम
शोधनिबंधात डॉ.सुनील नेवे यांनी भारतातील निवडणूक आयोग जगातील सर्वात उत्तम असा निवडणूक आयोग असून भारतीय लोकशाही चौकटीतील एक कोनशिला म्हणून निवडणूक आयोगाकडे पाहता येईल. जगात भारत हा असा एकमेव देश आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोग हा अत्यंत निर्भीडपणे निष्पक्षपणे आपली भूमिका बजावीत आहे. 1950 पासून आज पर्यंत ज्या-ज्या निवडणुका देशात झाल्या या सगळ्या निवडणुकीचे संचालन निवडणूक आयोगाने केले. हिंसाचार विरहित निवडणुका पार पाडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत दुर्गम असलेल्या डोंगराळ भागात, पहाडात, नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या प्रत्येक मतदाराला मतपेटीपर्यंत जाऊन मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने प्राप्त करून दिली आहे.