भुसावळकरांच्या कायम ऋणात राहणार : आमदार संजय सावकारे

आमदार संजयभाऊ सावकारे मित्र परिवारातर्फे सहृदय सत्कार : जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करणार


Will always be in debt to Bhusawalkar : MLA Sanjay Savkare भुसावळ (13 डिसेंबर 2024) : भुसावळात आतापर्यंत सलग दोन वेळा आमदार झाल्याचा इतिहास आहे मात्र मी सलग चौथ्यांदा बहुमताने निवडून आलेला पहिलाच भाग्यशाली आमदार आहे. भुसावळ शहर व तालुक्यातील जनतेचे प्रेम आपल्याला नेहमीच मिळत असून जिवाभावासारखे मित्र असलेले कार्यकर्ते, पत्नी व भावासह मतदारांची खंबीर साथ लाभल्यानेच हे शक्य झाले आहे. जनतेने चार वेळा आपल्याला आमदार बनवून मी जनतेचा आमदार असल्याचे सिद्ध केले आहे. शहरातील काहींना विकासकामात खोड्या करण्याची सवय असल्याने मी भूमिपूजनालाच काम मंजूर झाल्याचे सांगतो, असा उपरोधिक टोलाही आमदार संजय सावकारे यांनी येथे लगावला. बुधवार, 11 डिसेंबर रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार संजयभाऊ सावकारे मित्र परिवारातर्फे त्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

भुसावळकरांच्या कायम ऋणात राहणार
आज भुसावळकरांनी केलेल्या स्वागताने मी भारावलो असून आता पहिल्यांदा मला आमदार झाल्यासारखे वाटत असल्याचे आमदार म्हणाले. मी आमदार झाल्यानंतर अनेकांनी मला आमदार केल्याचे श्रेय लाटले मात्र भुसावळच्या इतिहासात सलग चार वेळा मीच आमदार झाल्याचे दुर्मीळ उदाहरण आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक वावड्या उठवण्यात आल्या मात्र जनता-जनार्दनाचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने प्रचंड मताधिक्याने मी विजयी झालो व यंदातर लीडही वाढला. माझ्या कार्यकर्ते व मतदारांवर पूर्ण विश्वास होता शिवाय आमची बुथ रचना अत्यंत सक्षम होती.

जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होणार
आमदार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची निश्चितपणे पूर्ती करण्यात येईल यात शंका नाही. माझ्या विजयासाठी पहिल्या निवडणुकीपासून वासुभाऊ बोंडे, माजी आमदार नीळकंठ फालक यांची साथ मोलाची ठरली असून त्यांच्या कायम ऋणातच राहणार असल्याचे आमदार म्हणाले. सर्वसामान्य जनतेकडून असो की कार्यकर्त्यांनी आणलेले काम असो होणार असल्यानंतर मी हो सांगतो अन्यथा स्पष्टपणे नाही, सांगतो व कुणाचीही फिरवाफिरव करीत नाही, असेदेखील आमदार म्हणाले.

पत्नीसह भावाची लाभली खंबीर साथ
निवडणुकीत माझ्या विजयासाठी पत्नी रजनी सावकारे यांची खंबीर व मोलाची साथ लाभल्याचे आमदारांनी नमूद केले. महिला मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महिलांचे संघटन मजबूत करण्यात आले व त्या माध्यमातून मोठी शक्ती आपल्या पाठीमागे उभी राहिले. मोठे बंधू प्रमोद सावकारे यांची नेहमीच साथ व मार्गदर्शन लाभत आल्याचे त्यांनी सांगत माझी विचार करण्याची क्षमता जेथून संपते तेथून त्यांची वैचारिक शक्ती सुरू होते, असे आमदारांनी नम्रपणे नमूद करीत आई सुशीला सावकारे यांचाही आशीर्वाद लाभल्याचे सांगितले.

मला आमदार सावकारे यांना त्रास देणारे सारखेच
रावेरचे आमदार अमोल जावळे यांचाही सत्कार करण्यात आला. आमदार जावळे म्हणाले की, संजूभाऊ सावकारे हे सलग चौथ्यांदा निवडून आले ही त्यांच्या कामाची पावती आहे. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत व शिकण्यासारख्याही आहेत. शहराला चांगला नेता मिळणे ही भाग्याची बाब आहे. विशेष म्हणजे आमदार सावकारे यांना व मला समोरून व पाठीमागून त्रास देणारे एकच असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर आमदारांच्या आई सुशीलाबाई सावकारे, त्यांच्या सौभाग्यवती रजनी संजय सावकारे, उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियाणी, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगरसेवक व सीए प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवा वाणी, निकी बत्रा, अजय नागराणी, चंद्रशेखर (मोंटू अग्रवाल), नितीन धांडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, संतोष (दाढी) चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक, भुसावळ तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी सभापती व शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोटरीतर्फे वही तुला
आमदारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब भुसावळ रेल सिटी वही तुला करण्यात आली. वही तुलातील शैक्षणिक साहित्य रोटरीतर्फे दत्तक घेण्यात आलेल्या मुसाळतांडा गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अध्यक्ष अ‍ॅड.विशाल शाह, सचिव अनिल सहानी, आशिष पटेल, चेतन पाटील, सोनू मांडे, मंगेश यावलकर आदींची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !