लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी : दोन दिवसात डिसेंबरचा हप्ता खात्यात होणार जमा
जळगाव (13 डिसेंबर 2024) : महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेने तारल्यानंतर सरकारने अर्थसंकल्पानंतर लाभाची रक्कम 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच डिसेंबरचा हप्ता खात्यात केव्हा जमा होणार ? याची उत्सुकता असताना ही रक्कम दोन दिवसात जमा होईल,असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
बहिणींना दिली पवारांनी खुषखबर
दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींचे पैसे दोन दिवसात खात्यामध्ये येतील, असे सुतोवाच केल.े सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींना माहिती दिली.

दरम्यान, लाडकी बहीण योजनासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेय. निकष बदलले जाणार, काही महिला अपात्र ठरणार, यासारख्या चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. त्यासंदर्भात मुनगंटीवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसांत 1500 रुपये खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले.
लाडकी बहीण योजनांचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत. या संदर्भात मी अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ही योजना कुठेही बंद पडणार नाही. या विरोधात काँग्रेस पक्ष कुठे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा. पात्रता आणि निकषांत बदल होणार नाहीत. फक्त अफवा पसरवत आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिन्याला मिळत आहे. जुलै ते नोव्हेंबर असे आतापर्यंत 5 हप्त्याचे 7500 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले.




