भुसावळ रेल्वे विभागात सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम


भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 अंतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक सेवेमध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक मूल्ये अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश होता.

सतर्कता जागरूकता वॉकाथॉन
सतर्कता जागरूकता सप्ताहाच्या अंतर्गत मंडल रेल कार्यालय, भुसावळ परिसरात सतर्कता जागरूकता वॉकाथॉन आयोजित करण्यात आला. या वॉकाथॉनला मध्य रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नीरज कुमार दोहरे आणि भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या वॉकाथॉनमध्ये विभागातील वरिष्ठ अधिकारी, शाखाधिकारी, रेल्वे कर्मचारी, रेल्वे शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी तसेच विविध विभागांतील कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वॉकाथॉनच्या माध्यमातून प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीचा संदेश देण्यात आला. सहभागी अधिकारी व कर्मचार्‍यांनी सतर्कता आणि नैतिक मूल्यांशी संबंधित संदेश व घोषणांच्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.

क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेची पाहणी
वॉकाथॉननंतर वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, डीआरम पुनीत अग्रवाल यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्था, भुसावळची पाहणी केली. पाहणीदरम्यान मेस, सिम्युलेटर, मॉडेल रूम, ग्रंथालय यांसह विविध सुविधा व व्यवस्थांची पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांकडून या सुविधांची कार्यपद्धती, देखभाल तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेण्यात आली आणि आवश्यक सूचना देण्यात आल्या.

सतर्कता जागरूकता परिसंवाद
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, मुख्य सतर्कता अधिकारी (अभियांत्रिकी) प्रदीप एस.पॉल, उपमुख्य सतर्कता अधिकारी (विद्युत) सुनीलकुमार बैरवा, उपमुख्य सतर्कता अधिकारी चंद्रकांत कदम, उपमुख्य सतर्कता अधिकारी (वाहतूक) प्रदीप हिराडे, उपमुख्य सतर्कता अधिकारी (सिग्नल व दूरसंचार) सुधांशु कुमार, वरिष्ठ सतर्कता अधिकारी (यांत्रिक) मेधाने राहुल भाऊसाहेब यांचा समावेश होता.

उत्तरदायित्वाला सर्वोच्च प्राधान्य
भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रेल्वेच्या कामकाजात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्वाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना नियमांचे पालन करून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने आपल्या जबाबदार्‍या पार पाडण्याचे आवाहन केले. परिसंवादाचा समारोप संवादात्मक प्रश्नोत्तर सत्राने झाला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !