जळगावातील लाचखोर आरटीओ दीपक पाटील यांची उचलबांगडी : धुळ्याच्या अशोक पवारांकडे पदभार
जळगाव (8 जानेवारी 2025) : वाहन निरीक्षकाला नवापूर चेक पोस्टवर बदली दिल्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच मागून खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना जळगावातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना पकडण्यात आले होते. पाटील यांच्यावर टीकेचे झोड उठल्यानंतर परिवहन आयुक्तांनी त्यांची उचलबांगडी करीत मुंबईत बदली केली तर त्यांच्या जागी धुळ्याचे आरटीओ अशोक पवार यांच्याकडे जळगाव आरटीओचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला.
नूतन अधिकार्यांनी स्वीकारला पदभार
नूतन अधिकारी अशोक पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार घेतला. सकाळच्या पहिल्या सत्रात त्यांनी पदभार स्वीकारण्यासह अधिकार्यांच्या बैठका तर दुपारच्या सत्रात कार्यालयात फेरफटका मारून इतर कर्मचार्यांशी संवाद साधून कामकाज कसे चालते याची माहिती त्यांनी घेतली.
काय आहे नेमके प्रकरण ?
जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रादेशिक कार्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर सुमारे वर्षभरापासून रिक्त आरटीओपदी दीपक पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांना दोन महिने होत नाही तोच तीन लाख रुपयांची लाच खाजगी पंटर भिकन भावेच्या माध्यमातून स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर छातीत दुखत असल्याने दीपक पाटील यांना रुग्णालयात हलवण्यात आले व नंतर एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र त्याचवेळी त्यांच्या आईच्या निधनाची वार्ता आल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 3 रोजी दीपक पाटील यांच्या बदलीचे आदेश काढले.