विहिर खोदकाम करताना स्फोटात तरुणाचा मृत्यू : जामनेर तालुक्यातील घटना
जामनेर (8 जानेवारी 2025) : जामनेर तालुक्यातील अंबीलहोळ येथे विहिर खोदकामाचे काम चालू असताना अचानक ब्लास्टिंगच्या स्फोटात राहुल वाघ वय (32, रा.मुंदखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला तर भूपेश चव्हाण (22, रा.अंबील होळ) हा गंभीर जखमी झाला.
काय घडले नेमके ?
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले व एकच पळापळ झाली.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी भूपेश चव्हाण यांना तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधित अधिकार्यांकडून माहिती घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांना धीर दिला तसेच जखमीना तातडीच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विहिरीच्या कामासाठी घेतल्या जाणार्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश करत हंबरडा फोडला.





