भव्य विशाल मंडपात फक्त 18 इंच मूर्ती स्थापन करणारे भुसावळातील जय गणेश फाऊंडेशन राज्यात एकमेव
भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : भव्य असा आरास मंडप, दहा दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आणि मूर्तीची उंची फक्त अठरा इंच… हे आहे भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशन नवसाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य !
20 वर्षांची परंपरा कायम
मागील 20 वर्षांपासून भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक नवसाचा गणपती गणेशोत्सव साजरा केला जातो. यात भव्य अशी आरास उभी केली जात असून त्यात भारतभरात अक्षरधाम मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, तामिळनाडू मधील सुप्रसिद्ध आदीयोगी आदी मंदिरांच्या भव्य दिव्य प्रतिकृती सादर केल्या तसेच बारा ज्योतिर्लिंग, शिवसृष्टी- ब्रह्मांड सृष्टी , मातापिता हेच विश्व तसेच गणपती विवाहसोहळा आदी विषयांवर अध्यात्मिक व धार्मिक, समाज प्रबोधनाचे देखावे सादर करण्यात आले. यंदा भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला उपदेश केलेल्या श्रीमद भगवद्गीतेवर आधारित गीता दर्शन मंदिराची भव्य अशी आरास निर्माण करण्यात आली. एवढ्या मोठ्या मंदिरात मागील 20 वर्षांची परंपरा कायम ठेवत गणपतीची फक्त अठरा इंचाचीच मूर्ती स्थापन करण्यात आली. कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात असे एकमेव गणेशोत्सव मंडळ असू शकते.

उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सव साजरा करतांना जय गणेश फाऊंडेशनकडून संपूर्ण दहा दिवस लहान थोरांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांसाठी विविध स्पर्धा, व्याख्यान, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात त्रिपदी व अथर्वशीर्ष पठण, विष्णू सहस्रनाम जाप, सुदृढ बालक स्पर्धा, स्लो सायकलिंग स्पर्धा, सामूहिक शंखनाद, भजन, गाईड हे एक अंकी नाटक, रांगोळी, स्मरणशक्ती, सोलो व ग्रुप डान्स, रंगभरण, निबंध लेखन (आजच्या गणेशोत्सव चे स्वरूप), महिलांसाठी होम मिनिस्टर, ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालणे स्पर्धा, युवकांसाठी जेन झी टू जेन अल्फा विथ गणपती बाप्पा हे प्रबोधनात्मक चर्चासत्र, दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नशामुक्तीसाठी नाटीका, हिंदी मराठी गीतांची सदाबहार सूर झंकार, 108 कलाकारांचा सामूहिक सादरीकरणाचा स्वराविष्कार, पोटात दुखतंय विनोदी नाटीका आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहे.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
उत्सव यशस्वीतेसाठी जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, कार्याध्यक्ष तुषार झांबरे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर व निलेश कोलते, सचिव प्रकाश चौधरी, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष विशाल आहुजा, युथ क्लब अध्यक्ष हर्षल वानखेडे, नचिकेत यावलकर, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सुधीर देशपांडे, रविंद्र पाटील, संतोष भारंबे, ललित धांडे, बाबूसेठ चोरडिया, रामा चौधरी, अनिल वानखेडे, रवी जोनवाल, प्रा.ए.व्ही.चौधरी, आर्य नेमाडे, ओम चौधरी, पार्थ चौधरी, अभिषेक वाणी, जगदीश राठोड, अमरीश करसाळे, योगेश पवार, अशोक धांडे, प्रवीण पाटील, संदीप दुसाने, महेंद्र महाजन, कृष्णा मराठे, प्रभाकर चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


