जळगावात धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबवली


जळगाव (12 जानेवारी 2025) : महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत झटका मारून खेचून घेत भामटे दुचाकीने पसार झाले. शहरात 100 फुटी रस्त्यावर हॉटेल शामबा पॅलेससमोर गुरुवार, 9 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शुक्रवार, 10 रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
सपना भूषण पवार (26, रा.खेडी बुद्रूक) या महिला कामानिमित्त शहरात आल्या होत्या. त्या रस्त्याच्याकडेला थांबल्या असता तोंडाला पांढरा रुमाल बांधून आलेले दोन संशयित दुचाकीने त्यांच्या दिशेने आले. त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची सुमारे 50 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत झटका मारून खेचून घेतली. सोन्याची पोत हाती लागताच भामटे सुसाट वेगात दुचाकीवरून पसार झाले. महिलेने आरडाओरड केली, तोवर संशयित पळाले होते.


घटना कळताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेऊन फुटेज ताब्यात घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांनी केल्या. तक्रारीनुसार या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !