राजकीय वातावरण पेटणार : अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक !


Akshay Shinde’s encounter fake! मुंबई (20 जानेवारी 2025) : राज्यात गाजलेल्या बदलापूरातील शाळेतील रिनष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीबाबत झालेल्या मृत्यूबाबत मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला असून त्यात आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणार्‍या पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाच पोलिस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

त्या पोलिसांवर दाखल होणार गुन्हा
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला पाच पोलिसांना जवाबदार धरत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.

काय आहे नेमके प्रकरण
बदलापुरात एका शाळेत शिकणार्‍या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. एका दुसर्‍या प्रकरणात त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसर्‍या तुरुंगात नेत असताना वाटेत त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिस परिस्थिती सहज हाताळू शकले असते
अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असे फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणार्‍या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे, असे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार पोलिस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य ठरू शकत नाही. त्यामुळे राज्याने या पोलिसांवर एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

 


कॉपी करू नका.