धोकादायक वळणावर तीन वेळा चैन पुलिंग ; परधाडे रेल्वे अपघाताची एचएजी चौकशी

जीएम यांची भेट ः पुष्पक व कर्नाटक एक्स्प्रेसवरील रनिंग स्टॉफचे नोंदवले जवाब


गणेश वाघ

भुसावळ (24 जानेवारी 2025) : आग लागल्याच्या अफवेनंतर जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या 12 प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी पावणेपाच वाजता पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. अपघाताच्या दिवशी रात्री मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) यांनी घटनास्थळाला भेट देत रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस करीत अपघाताची माहिती जाणली. दरम्यान, गंभीर अपघातानंतर रेल्वेने या प्रकरणी एचएजी (हाय अ‍ॅडमिनिस्ट्रेशन गे्रड) चौकशी स्थापन करण्यात आली आहे. या समितीने गुरुवारी कर्नाटक व पुष्पक एक्स्प्रेसच्या रनिंग स्टाफची चौकशी करून जाब-जवाब नोंदवले.

मध्य रेल्वे जीएम यांनी घेतली जखमींची भेट
बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मुंबईकडे निघालेल्या पुष्पकच्या डी- 4 या जनरल डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी चैन पुलिंग (एसीपी) करीत गाडी थांबवली व भीतीपोटी प्रवाशांनी डाऊन ट्रॅकवर उड्या घेतल्यानंतर काही क्षणात डाऊन कर्नाटक एक्स्प्रेस आल्यानंतर तिने 12 प्रवाशांना चिरडले तर 11 प्रवासी या घटनेत जखमी झाले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीणा यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पाचोरा येथे रुग्णालयात जखमींची त्यांनी भेट घेत माहिती जाणली तसेच जळगाव सिव्हील हॉस्पीटल तसेच गोदावरीला जात तेथे रुग्णांची चौकशी केली.

अधिकार्‍यांकडून घटनास्थळाची पाहणी
यावेळी त्यांच्या समवेत डीआरएम ईती पाण्डेय उपस्थित होत्या. रात्री अंधारात बॅटरीच्या प्रकाशझोतात घटनास्थळ गाठत त्यांनी पाहणी केली. मुख्य सुरक्षा आयुक्त एस.एन.चौधरी, लोहमार्ग पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांच्यासह लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर, रेल्वेचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे अपघाताची एचएजी चौकशी
12 प्रवाशांना चिरडल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताची एचएजी चौकशी सुरू करण्यात आली आहे. हाय अ‍ॅडमिनिस्ट्रेशन गे्रड समितीत चौकशी अधिकारी प्रिंन्सीपल सेप्टी डीएफएफ, पीसीएमई, पीसीएसओ, सी ऑपरेशन आदींचा समावेश आहे. पहिल्या दिवशी गुरुवारी कर्नाटक एक्सप्रेसवरील लोकोपायलट एस.जे.विश्वकर्मा, सहा.लोकोपायलट पंकज बोरसे तसेच पुष्पक एक्सप्रेसवरील लोकोपायलट, सहाय्यक लोकोपायलट तसेच दोन्ही एक्स्प्रेसमधील टीटी, गार्ड, स्टेशन मास्तर यांची चौकशी करून समितीने जवाब नोंदवले. नाशिक रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांचेही जवाब नोंदवण्यात आले.

तीन वेळा चैन पुलिंग : धोकादायक वळणाने गेला बळी
खास सूत्रांच्या माहितीनुसार, अप पुष्पक एक्स्प्रेसच्या डी- 4 या डब्यातून काही जण धुम्रपान करीत होते व त्यातच धूराचे लोट निघाल्यानंतर गाडीत आग लागल्याची अफवा कुणीतरी पसरवली व प्रवाशांनी आग-आग ओरडल्यानंतर प्रवाशांमध्ये चलबिचल होवून चैन पुलिंग करण्यात आली मात्र गाडीचा वेग अधिक असल्याने तीनवेळा चैन पुलिंग केल्यानंतर ब्रिजजवळ गाडी थांबली.

माहेजी-परधाडेदरम्यानच्या भोलानजीक जेथे गाडी थांबली तेथे धोकादायक वळण आहे मात्र पुष्पक एक्सप्रेस थांबल्यानंतर तिचे लाईट पाहून कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाला अंदाज आल्यानंतर त्याने तातडीचे (इर्मजन्सी) ब्रेक लावत हॉर्नही वाजवला मात्र 650 मीटर अंतरावर जावून गाडी थांबली मात्र तो पर्यंत उशीर होवून 12 प्रवासी चिरडले गेले व 11 प्रवासी जखमी झाले होते. साधारण एका तासाच्या अंतराने दोन्ही गाड्या पुढील प्रवासास रवाना झाल्या तर भुसावळसह नाशिकमध्ये रेल्वे गाड्यांच्या इंजिनाची यंत्रणेकडून पुन्हा तपासणी करण्यात आली.

रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वेकडून 50 हजारांची मदत
रेल्वे अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या वारसांना रेल्वेकडून तातडीची मदत म्हणून 50 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले तसेच उर्वरित एक लाखांची मदत नातेवाईकांच्या बँक खात्याद्वारे खात्री केल्यानंतर दिली जाणार आहे. त्या शिवाय जखमी प्रवाशांना एकूण दोन लाख 70 हजारांची मदत देण्यात आली. त्यात गंभीर दुखापतीसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात आले. त्यात हसन अली, विजय कुमार, उत्तम हरजन, धर्मा सावंत, अबू मोहम्मद यांना प्रत्येकी 50 हजार तर किरकोळ जखमांसाठी प्रत्येकी पाच हजारांची मदत मोहरम, . हकीम अन्सारी, दीपक थापा, हुजला सावंत यांना देण्यात आली.


कॉपी करू नका.