पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये सलग दुसर्‍या दिवशी सात किलो गांजा जप्त


Seven kg of ganja seized in Puri-Ahmedabad Express for the second consecutive day भुसावळ (31 जानेवारी 2025) : पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून 10 किलो गांजा मंगळवारी रात्री पकडल्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी रात्री त्याच गाडीतून पुन्हा सात किलो गांजा जप्त करण्यात रेल्वे सुरक्षा बलास यश आले आहे. सलग दोन दिवसात 17 किलो गांजा जप्त झाल्याने गांजा तस्कर हादरले आहे. गांजाचे ओडीसा कनेक्शन समोर आले असून यंत्रणेकडून आता गांजा तस्करांवर लवकरच कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.

गांजाचे ओडीसा कनेक्शन
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून सलग दोन दिवस रेल्वे सुरक्षाबलाने गांजा जप्त केला. मंगळवारी 10 तर बुधवारी रात्री 7 किलो गांजा पकडला. यामुळे पुरी-अमदाबाद एक्स्प्रेसमधून नियमीत गांजांची तस्करी होत असावी, असा सुरक्षा यंत्रणेचा कयास आहे. भुसावळ जंक्शनवर पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस मंगळवारी आल्यावर बेवारस स्थितीत असलेली पिशवी एका प्रवाशाने उग्र वास येत असल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडे सोपविली. आरपीएफने सीसीटिव्ही कॅमेर्‍यात पंचासमक्ष पिशवी उघडली असता त्यात 10 किलो कोरडा गांजा आढळला. त्याची किंमत एक लाख 2 हजार 930 रुपये असून त्यानंतर दुसर्‍या दिवशी बुधवारी रात्री अप 12843 या गाडीच्या पँन्ट्री कारमध्ये काळ्या रंगाची पिशवी संशयास्पद असल्यानंतर टीसी आशिष चावरे यांनी ही पिशवी मलकापूर येथील रेल्वे सुरक्षा बलाकडे सोपविली. त्यांनी तहसीलदार व पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात आठ पॅकेटमध्ये ओला गांजा आढळला.

पंच, फोटोग्राफरच्या उपस्थितीत मोजमाप
रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवान यांनी तहसीलदार, फोटोग्राफर, पंच यांच्या समक्ष गांजा मोजला असता तो गांजा सात किलो 809 ग्रॅम भरला. त्याची किंमत 78 हजार 90 रुपये आहे. आरपीएफने जप्त केलेला गांजा, पंचनामा हे प्रकरण शेगाव लोहमार्ग पोलिसांकडे सुपुर्द केले. शेगाव लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुरी-अहमदाबाद आरपीएफच्या रडारवर
सलग दोन दिवस पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून गांजा जप्त करण्यात आल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या रडारवर पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस आहे. या गाडीवर सुरक्षा वाढवण्यात आली असून विशेष करून जनरल डब्यात आरपीएफ गस्त करणार आहे. बडनेरा, अकोला, मुर्तीजापूर, शेगाव, मलकापूर या स्थानकावरील अधिकारी व जवान जनरल डब्याची पाहणी करतील.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !