जळगाव महामार्गावर हेल्मेट न घालणार्‍या 250 वाहनधारकांवर कारवाईचा दंडुका


जळगाव (3 फेब्रुवारी 2025) : महामार्गावर हेल्मेट परिधान न करता दुचाकीवरुन प्रवास करणार्‍या 244 वाहन धारकांवर जळगाव शहर वाहतूक पोलिसांनी सोमवार,3 रोजी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून दोन लाख 44 हजार दंड ठोठावण्यात आला. मंगळवार, 4 रोजी कारवाईचा धडाका सुरूच होता.

वाढत्या अपघातांना लागणार ब्रेक
वाढत्या अपघाताच्या घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गावर सोमवार, 3 पासून दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज वाहतून शाखेचे पोलीस महामार्गावर उतरले. शिव कॉलनी, आयटीआय तसेच आकाशवाणी चौकात आज वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.

या कारवाईत विना हेल्मेट अशा 224 दुचाकीस्वार चालकांना तब्बल 2 लाख 24 हजाराचा दंड ठोकला. हे ममो अनपेड असुन त्यांना दंडाची रक्कम अदा करावी लागणार आहे. तर विना हेल्मेटच्या 20 दुचाकीस्वार चालकांकडून 20 हजाराचा दंड वसुल करण्यात आला. अन्य 52 केसेसमध्ये 43 हजाराचा दंड करण्यात आला.

मंगळवारी कालिंका माता चौक, अजिंठा चौक, मानराज पार्क या ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट संदर्भात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत 20 कर्मचारी सहभागी झाले आहेत.

महामार्गावर दुचाकीवरुन दोन व्यक्ती प्रवास करीत असल्यास दोघांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. चालकाने हेल्मेट घातले आणि मागे शीटवर बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट डोक्यात घातले नसल्यास तरीही दंड आकारण्यात येणार आहे.

हेल्मेट वापरा … भुर्दंड टाळा
महामार्गावर हेल्मेटचा दुचाकीवर वापर करुन दंडाचा भुर्दंड टाळावा,असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. हेल्मेट सक्ती ही दंडासाठी नव्हे तर जीव सुरक्षासाठीची गरज आहे. नागरिकांनी स्वत:साठी आणि कुटुंबासाठी हेल्मेटचा वापर करावा, असेही आवाहन केले आहे.


कॉपी करू नका.