40 हजारांची लाच भोवली : सरपंचासह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात


जळगाव (12 फेब्रुवारी 2025) :  व्यायामशाळेसाठी निधी मंजूर झाल्यानंतर तीन लाखांचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती 40 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा तालुक्यातील मेहू येथील सरपंच, त्यांचे पती, मुलगा व खाजगी पंटराला जळगाव एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. एकाच कुटूंबातील तीन सदस्यांना लाच प्रकरणात पकडण्यात आल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

सरपंचांसह चौकडीला अटक
अटकेतील आरोपींमध्ये मेहू सरपंच जिजाबाई गणेश पाटील (43), सरपंच यांचा मुलगा शुभम गणेश पाटील (26, देवरे), सरपंच पती गणेश सुपडू पाटील (55) व सेतू सुविधा केंद्र चालवणारा खाजगी इसम समाधान देवसिंग पाटील (35, बोदडे) यांचा समावेश आहे.

असे आहे लाच प्रकरण
47 वर्षीय तक्रारदार हे 2017-18 ते सन 2022- 23 मध्ये मेहू गावाचे सरपंच होते. या दरम्यान ग्रामपंचायत मेहू यांनी मेहू गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी काम दिले होते. व्यायामशाळेचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत सात लाखांचा निधी मंजूर झाला व 2023 मध्ये आरोपी जिजाबाई पाटील यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली. त्यानंतर तक्रारदाराने सरपंचांकडे व्यायाम शाळेच्या मंजुर निधीची मागणी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने केली असता आरोपी सरपंच पाटील यांनी आधी चार लाखांचा धनादेश संबंधित कंपनीच्या नावाने दिला व उर्वरित तीन लाख रुपयांचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात 31 जानेवारी 2025 रोजी एक लाख व नंतर 70 हजार रुपये लाच मागितली तसेच सरपंच पती गणेश पाटील यांनी 40 हजारांची लाच रक्कम 3 फेब्रुवारी मागितली. एसीबीने प्राप्त तक्रारीची वेळोवेळी पडताळणी केल्यानंतर बुधवारी मेहू गावात सापळा रचला. खाजगी पंटर समाधान पाटीलने लाच स्वीकारताच अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या अंगझडतीत 10 हजार 170 रुपये जप्त करण्यात आले.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.
WhatsApp Group