जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

जळगाव (18 फेब्रुवारी 2025) : जळगाव नगरभूमापन कार्यालयातील ऑपरेटरला एक हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. अविनाश सदाशिव सनांसे (49) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
30 वर्षीय तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस लावण्याचे, हक्कसोड करण्याचे व कर्जाच्या बोजाची नोंद घेण्यासाठी ऑपरेटर सनांसे याने तक्रारदाराकडे नगर भुमापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून काम करून देण्याच्या मोबदल्यात सुरूवातीला प्रत्येक नोंद घेण्यासाठी 15000 व कामाला सुरूवात करुन देण्यासाठी दिड हजारांची लाच मागितली व त्यातील एक हजार रुपये स्वीकारताना मंगळवारी सायंकाळी त्यास अटक करण्यात आली व संशयीताविरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या अंग झडतीत त्याच्याकडील एक हजार 800 रुपये जप्त करण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.


