महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव (10 मार्च 2025) : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या सण 2025-26 चा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सादर केला. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही हे ब्रीदवाक्य घेऊन जनतेसाठी सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजना पुढे नेत असतानाच शेती, उद्योग, दळणवळण यातील पायाभूत सुविधांना बळकटी देत योग्य आर्थिक समन्वय अर्थसंकल्पात साधला गेला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद, शेतकर्यांना मोफत वीज, 0 ते 100 युनिट वीज वापरकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना सौरऊर्जा माध्यमातून 0 वीजबिल, गरिबांना घरकुल बांधकामासाठी अतिरिक्त 50 हजारांचे अनुदान, नदीजोड व सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रेरणादायी स्मारक व पानिपत येथे मराठा योद्धे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली. एकंदरीतच राज्याला प्रगतीपथावर नेणारा व सर्व समाजघटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघासाठी सिंचन, रस्ते, पर्यटन, मूलभूत सुविधा आदी विकासकामांसाठी देखील भरघोस तरतूदी असून त्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली.


