आनंदाचा शिधा योजना : ‘शिवभोजन थाळी’ योजना अखेर बंद !

जळगाव (13 मार्च 2025) : सणासुदीच्या दिवसात राज्यातील गरिबांसाठी आधार असणारी ‘आनंदाचा शिधा’ योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लागू करण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास 1 कोटी 63 लाख लाभार्थींना झाला होता.
राज्य सरकारने निवडणुकीच्या आधी काही महत्त्वाच्या योजना लागू केल्या होत्या. त्यात आनंदाचा शिधा या योजनेचाही समावेश होता. त्यानंतर आता ही योजना बंद करण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त 100 रुपयांमध्ये वरील पाच वस्तू दिल्या जात होत्या. त्यात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. मात्र, आता ही योजना बंद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचे वाटप करण्यात आले. परंतु, त्यामध्ये आनंदाचा शिधा आणि इतर काही योजनांच्या निधीबाबत कुठेही भाष्य करण्यात आलेले नव्हते. मात्र, आता ही योजना बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. आता मात्र राज्य सरकारने आर्थिक स्थितीचा विचार करून ही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटींच्या पुढे गेली असून ती सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या तीन टक्के इतकी आहे. यामुळे काही कल्याणकारी योजना बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. या सोबत उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी’ या योजना बंद करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली होती. ही योजनाही बंद करण्यात येणार असल्याच सांगितले जात आहे.


