मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्री आठवलेंकडून घरचा आहेर : म्हणाले, सारखे राज ठाकरेंच्या घरी जातात, हिंमत मग वाढणारच !
जळगाव (9 एप्रिल 2025) : राज ठाकरे यांची माणसे मराठी येत नाही म्हणून मुंबईतील उत्तर भारतीयांना मारझोड करत आहेत, हे काही सभ्य समाजाचे, सभ्य शहराचे, सभ्य नेतृत्वाचे लक्षण नाही. राज यांच्या भूमिकेशी मी अजिबात सहमत नाहीत. मुंबई ही देशाच आर्थिक राजधानी आहे. देशभरातून लोक इथे येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी-नेहमी राज ठाकरे यांच्या घरी जात असतात, त्यामुळे सकारात्मक हिम्ंमत संचारली तर ते उत्तमही आहे, पण नकारात्मक बाबींना प्रोत्साहन मिळते आहे, असे स्पष्ट दिसत असेल तर फडणवीस यांनी राज यांच्या घरी जाऊ नये, असा सल्लावजा आहेर (महायुती अंतर्गत घरचा) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथे दिला.
मुंबईची अर्थव्यवस्था धोक्यात
जळगाव येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अनेक विषयांवर आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, खरेतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊच नये, पण ते असे दोन-तीनदा जाऊन आलेत. मराठीच्या नावाखाली लोकांना मारहाण करण्याने मुंबई बदनाम होते आहे. मुंबईची अर्थव्यवस्था त्यामुळे धोक्यात आली आहे. मनसेच्या मनमानीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष दिले पाहिजे आणि मनसेनेही विकासाबद्दल बोलले पाहिजे. नकारात्मक भाईगिरी योग्य नाही. बँकांमध्ये मराठीचा आग्रह करणे चुकीचे आहे, असे आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले.




तर बाबासाहेब देशाचे पंतप्रधान झाले असते !
संविधानात सर्वांचे योगदान होते, मात्र बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा त्यात आहे. स्वत: पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबू राजेंद्र प्रसाद यांनी, बाबासाहेब हेच संविधानाचे शिल्पकार असल्याचे म्हटलेले असल्यावर कुणी याविषयावर काही बोलण्याची गरजच नाही, असे स्पष्ट करून आठवले म्हणाले, बाबासाहेब अजून जगले असते तर देशाचे पंतप्रधान झाले असते.