खान्देशच्या केळीचा गोडवा पोहोचला विदेशात
घुसर्डी खुर्दच्या शेतकरी रायचंद परदेशी यांच्या दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल 3,100 रुपयांचा भाव ; आतापर्यंत अडीचशे क्विंटल माल निर्यात
अशोक परदेशी
भडगाव (11 जुलै 2026) : भडगाव तालुक्यातील घुसर्डी खुर्द येथील प्रगतीशील शेतकरी रायचंद शामसिंग परदेशी यांच्या शेतातील दर्जेदार केळीने विदेशी बाजारपेठेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. बॉक्स पॅकिंगद्वारे निर्यात करण्यात आलेल्या केळीच्या मालाला प्रतिक्विंटल 3,100 रुपये इतका समाधानकारक भाव मिळाला असून, यामुळे खान्देशच्या केळीचा गोडवा आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दर्जेदार उत्पादन
गिरणा नदीच्या काठावर वसलेले घुसर्डी खुर्द हे गाव केळी बागायतीसाठी तालुक्यात विशेष ओळखले जाते. गावातील बहुतांश शेतकरी केळी लागवड करतात. मेहनत, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य देत येथील शेतकरी दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्याचाच प्रत्यय रायचंद परदेशी यांच्या यशातून पुन्हा एकदा आला आहे.

सहा एकर क्षेत्रात केळी लागवड
रायचंद परदेशी यांनी मागील वर्षी सुमारे सहा एकर क्षेत्रात 10 हजार केळी रोपांची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापनामुळे केळीचे भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळाले असून घडांचे सरासरी वजन सुमारे 23 किलोपर्यंत पोहोचले आहे. सध्या काढणी सुरू असून, दि. 3 रोजी त्यांच्या शेतातील केळीचा माल बॉक्स पॅकिंग करून श्रीनगर येथे पाठविण्यात आला. या मालाला प्रतिक्विंटल 3,100 रुपये असा चांगला दर मिळाला.
यापूर्वीही मागील आठवड्यात त्यांच्या शेतातील केळीचा माल इराक आणि इराण या देशांमध्ये निर्यात करण्यात आला होता. त्या मालालाही प्रतिक्विंटल 2,800 रुपये दर मिळाला. आतापर्यंत त्यांच्या शेतातील सुमारे अडीचशे क्विंटल केळीचा माल विविध ठिकाणी निर्यात झाला असून, दर्जेदार गुणवत्तेमुळे परदेशी बाजारपेठेत खान्देशच्या केळीची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
परदेशी बाजारपेठेत दर्जेदार केळीला मिळणारा चांगला प्रतिसाद आणि समाधानकारक दर यामुळे परिसरातील केळी उत्पादक शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भविष्यातही असेच दर कायम राहिल्यास केळी शेती अधिक फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
गुणवत्तेमुळे मिळाला परदेशी बाजारपेठेचा विश्वास
दर्जेदार उत्पादन, आकर्षक आकार, योग्य वजन आणि निर्यातीसाठी आवश्यक निकष पूर्ण केल्यामुळे रायचंद परदेशी यांच्या केळीची निवड निर्यातीसाठी करण्यात आली. बॉक्स पॅकिंगद्वारे माल विदेशात पाठविण्यात आल्याने खान्देशच्या केळीची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
‘परदेशात केळी विकली जाणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण’
मागील वर्षी सहा एकर क्षेत्रात 10 हजार केळी रोपांची लागवड केली होती. मेहनतीमुळे दर्जेदार उत्पादन मिळाले. नुकताच श्रीनगर येथे पाठविलेल्या केळीला प्रतिक्विंटल 3,100 रुपये दर मिळाला. यापूर्वी इराक आणि इराण येथे निर्यात झालेल्या मालालाही प्रतिक्विंटल 2,800 रुपये दर मिळाला होता. आतापर्यंत सुमारे अडीचशे क्विंटल माल निर्यात झाला आहे. आमच्या शेतातील केळीचा माल विदेशात विकला गेला, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भविष्यातही असेच चांगले दर मिळाल्यास केळी शेती अधिक फायदेशीर ठरेल, असे घुसर्डीचे केळी उत्पादक रायचंद शामसिंग परदेशी म्हणाले.
