नाशिकसह भुसावळात 2400 मेगावॅट वीज निर्मिती संचासाठी सर्वेक्षण होणार !
महानिर्मितीकडून 3600 मेगावॅटची तुट भरुन काढण्यासाठी प्रयत्न
Survey to be conducted for 2400 MW power generation plant in Nashik and Bhusawal! भुसावळ (11 एप्रिल 2025) : महानिर्मितीने प्रशासनाने राज्यातील उच्चांकी वीज मागणीच्या काळात तब्बल 3600 मेगावॅट विजेची तुट निर्माण होते. ही तुट भरुन काढण्यासाठी आता 2400 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारणीचे नियोजन केले आहे. नाशिक येथे 800 मेगावॅटचे दोन व भुसावळात एक असे तीन सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत हे प्रकल्प असतील. यासाठी महानिर्मितीने मे. मेकॉन कन्सलटींग सर्व्हिसेस या खाजगी कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन अहवाल निर्मितीचे काम सुरू केले आहे.
अहवालाअंती मिळणार मंत्री मंडळाची मंजुरी
मे.मेकॉन ही कंपनी नाशिक व भुसावळ या दोन्ही ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक जागा, उपलब्ध पाणी, कोळशाचा पुरवठा, मनुष्यबळ आदींची माहिती घेवून महानिर्मितीला स्वयंस्पष्ट अहवाल देणार आहे. या अहवालानंतर महानिर्मिती राज्य शासनाच्या उर्जा विभागाकडे प्रस्ताव देवून मंत्रीमंडळाची मंजुरी घेणार आहे. महानिर्मिती कंपनीही नाशिक व भुसावळात नवीन प्रकल्प उभारणीसाठी अनुकूल आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी आगामी काळात हे मेगावॅटचे प्रकल्प उभे राहतील, असा अंदाज आहे.

राज्याला विजेची गरज
कोरोनानंतरच्या काळात राज्याची वीज मागणी वाढली आहे. 24 हजार मेगावॅटवर असलेली मागणी आता 29 हजार 500 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. या तुलनेत महानिर्मितीची क्षमता 13 हजार 835 मेगावॅट आहे. खाजगी उद्योग तसेच सेंट्रल सेक्टरमधून विजेची खरेदी करावी लागते, यानंतरही जवळपास 3600 मेगावॅट विजेची तुट निर्माण होते. आगामी काळातही विजेची मागणी वाढतच जाणार असल्याने ही तुट भरुन काढण्यासाठी नवीन प्रकल्प आवश्यक आहे.
नाशिक व भुसावळचीच निवड का?
भुसावळ औष्णिक केंद्रात 210 मेगावॅटचा एक, प्रत्येकी 500 मेगावॅटचे दोन, तर 660 मेगावॅटचा एक संच आहे. तर नाशिक केंद्रात प्रत्येकी 210 मेगावॅटचे तीन संच आहेत. भुसावळ व नाशिक येथील 210 मेगावॅटचे संच कालबाह्य असून सध्या ते विजेची गरज म्हणून सुरु आहेत. भविष्यात हे संच बंद होतील, या जागेवर या संचांना रिप्लेसमेंट म्हणून नवीन संच उभे करण्याचे महानिर्मितीचे प्रयत्न आहेत.
800 मेगावॅटचा पहिलाच प्रयोग
महानिर्मितीने राज्यात आतापर्यंत सर्वात अधिक म्हणजे 660 मेगावॅट संचांची उभारणी केली आहे. कोराडीनंतर या क्षमतेचा संच भुसावळात उभा राहून कार्यरत झाला. आता प्रथमच 800 मेगावॅट सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत संच उभारणी होणार आहेत. भुसावळात हा संच उभा राहिला तर भुसावळला सुपर थर्मल पॉवर स्टेशनचा दर्जा मिळणार आहे.
