गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना सल्ला : आम्ही पक्ष फोडतो, तशा तुम्ही शाळा फोडा
जिल्हा परिषद शाळेतील घटत्या पटसंख्येवरील सूचवलेल्या जालीम उपायाची राज्यभरात चर्चा
जळगाव (13 एप्रिल 2025) : पटसंख्या हा सध्या राज्यभरातील प्राथमिक शाळांमधील कळीचा मुद्दा बनलेला आहे. अनेक जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रांतून केवळ पटसंख्या (विद्यार्थी संख्या) कमी असल्याने त्या बंद करण्याची वेळ आलेली आहे. संबंधित शिक्षकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. या समस्येवर काय उपाय असू शकतो, यावर शैक्षणिक क्षेत्रात खल सुरू असताना जळगावचे पालकमंत्री यांनी एक जालीम उपाय सुचविला. विविध राजकीय पक्ष जसे इतर राजकीय पक्ष फोडतात, तसे शिक्षकांनी इतर शाळांतील विद्यार्थी फोडावेत, असा सल्ला त्यांनी दिला आणि त्याची एकच चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे.
पण अखेरच्या क्षणी तेही उडाले !
भाजप नेते अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडला होता. फोडलेल्या या सर्व आमदारांना शिंदे व्हाया सुरत थेट गुवाहाटीत सहलीला घेऊन गेलेले होते. शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे गोटात दबंग म्हणावे, अशा नेत्यांपैकी केवळ गुलाबराव पाटीलच उरलेले होते. तुम्ही कसे उरलात, या एका पत्रकाराच्या प्रश्नावर मी काय भाजीपाला आहे काय, जो विकला जाईल, असे बाणेदार उत्तर पाटील यांनी दिले होते, पण अखेरच्या क्षणी तेही उडाले! गुलाबरावांनाही गुवाहाटीतील हॉटेल, डोंगर, झाडी अशी मज्जा बघायला मिळायली होती! इतर शाळांतील विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत जास्त मज्जा आहे, अशी भुरळ घालावी हेच गुलाबराव पाटलांना सांगायचे होते!

ते म्हणाले, शिक्षकांनी नुसते हातावर हात धरून बसून राहू नये. आम्ही राजकीय पक्ष जसे फोडतो, तसे तुम्हीही इतर शाळांमधील विद्यार्थी फोडा आणि आपापल्या शाळा वाचवा.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातंर्गत तालुकास्तरावरील विजेत्या शाळांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते. जळगाव ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या एकूण 45 हजार विद्यार्थी आहेत. अलीकडच्या काळात त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. अनेक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याविषयी पाटील यांनी चिंता व्यक्त केली.
मंत्री पाटील यांनी नंतर आपल्या वक्तव्यावर सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. विनोदाने बोलून गेलो, असे ते म्हणाले. जसे आम्ही पुढारी एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते आपापल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो, तसे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत करावे, एवढेच मला म्हणायचे होते. यात दुसरा भाव नव्हता. पटसंख्या कशी वाढवता येईल, हे सांगण्यासाठी थोडी विनोदबुद्धी वापरली एवढेच, असे त्यांनी नमूद केले.
तर 50 हजार डीएडधारक मुले नोकरीला लागली असती
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने पटसंख्या वाढवून गुणवत्ता वाढीचा संकल्प करावा. संपूर्ण महाराष्ट्रात आपण जर मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवू शकलो असतो, तर आज 50 हजार डीएड झालेली मुले नोकरीला लागली असती.
आणखी काय म्हणाले पाटील?
माझी शाळा, सुंदर शाळा या राज्यस्तरीय उपक्रमामुळे समाजाचा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, अनेक जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण केंद्रात रूपांतरित होत आहेत. मात्र, फक्त शाळा स्वच्छ आणि सुंदर असणे पुरेसे नाही, तर त्या गुणवत्तापूर्णही असल्या पाहिजेत.
कार्यकर्ता म्हणून संघर्ष करत असताना इतर अनेक घटकांतील लोकांना माझ्याकडून त्रास झाला असेल, मात्र, शिक्षक हा एकच वर्ग असा आहे, ज्याला माझ्यापासून कधीच त्रास झाला नाही. शिक्षकांबद्दल माझ्या मनात एक वेगळे आणि श्रद्धेचे स्थान आहे.