यावल ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा बोजवारा : आमदार अमोल जावळेंकडून अधिकारी फैलावर
अस्वच्छतेसह डॉक्टरांच्या अनियमिततेमुळे संताप : रुग्णांशी साधला संवाद
Facilities at Yaval Rural Hospital in disarray: MLAs lash out at officials यावल (27 एप्रिल 2025) : यावल शहरातील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयातील अस्वच्छता, बंद असलेले एक्स-रे मशीन, पिण्याच्या पाण्याची समस्या, तसेच डेंटल डॉक्टर नियमितपणे न येण्याच्या अनेक गंभीर समस्या समोर आल्यानंतर आमदार जावळे यांनी अधिकार्यांना फैलावर घेतले. तातडीने समस्या सुटण्यासह रुग्णांना योग्य त्या सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सुविधा पुरवण्याच्या सूचना
आमदार अमोल जावळे यांनी रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकार्यांना योग्य त्या सुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या.
रुग्णालयातील परिस्थितीची डॉक्टरांनी दिली माहिती
रुग्णालयात अलीकडेच आलेले नवीन बेड व अन्य वैद्यकीय साहित्य त्वरित असेंबल करून वापरात आणण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत सोनवणे यांनी आमदारांना रुग्णालयातील सध्याची परिस्थिती आणि अडचणींची माहिती दिली. आमदार जावळे यांच्या या भेटीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. ते थेट रुग्णांशी संवाद साधत असल्याने नागरिकांना आपल्या अडचणी थेट मांडण्याची संधी या निमित्ताने मिळाली. स्थानिक लोकांनी आमदारांच्या या सक्रिय सहभागाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ.कुंदन फेगडे, राहुल बारी, पराग सराफ, बाळू फेगडे, कोमल इंगळे आदी उपस्थित होते.


