लाडक्या बहिणींना मंत्री नरहरी झिरवळांनी डिवचले : म्हणाले, 2100 रुपये देण्याची घोषणा केलीच नाही !
महायुतीच्या मंत्र्यांची लाभ देण्यावरून साततने पलटी ः 2100 रुपये देण्यावरून घूमजाव
गणेश वाघ
भुसावळ (27 एप्रिल 2025) : निवडणुकांच्या जाहीरनाम्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन सरकारने देत प्रत्यक्षात पंधराशे रुपये देण्यास सुरूवात केल्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर होता व त्यात अर्थमंत्री अजित पवारांनीही बजेट पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. मुक्ताईनगरात कलश यात्रेनिमित्त आलेल्या कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांना माध्यमांना विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणी खूष असल्याचे विधान करीत लाडक्या बहिणींच्या नाराजीवर मीठ चोळले आहे. 2100 रुपये आम्ही देवू, अशी कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती, असे सांगून त्यांनी घूमजाव केले आहे.
काय म्हणाले झिरवळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशतर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा अमृतकलश यात्रा या सांस्कृतिक यात्रेचा शुभारंभ रविवार, 27 एप्रिल रोजी सकाळी मुक्ताईनगरातून झाला. या कार्यक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आले असता माध्यमांनी त्यांना लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? अशी विचारणा केली असता त्यांनी अशी कोणतीही घोषणा सरकारने केली नसल्याचे सांगत घूमजाव केले.
महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने पुढे चालला असल्याचे सांगून ते म्हणाले की, पंधराशे रुपयांवरही लाडक्या बहिणी खूश आहेत. आधी विरोधक म्हणत होते की 1500 रुपये दिली जाणार नाही मात्र आता 2100 रुपयांची मागणी केवळ विरोधक व माध्यमांकडून केली जात आहे मात्र प्रत्यक्षात आम्ही अशी घोषणा केलेली नाही, असेही मंत्री झिरवळ म्हणाले. नितेश राणेंच्या वक्तव्यावर यावेळी त्यांनी बोलणे टाळले.
योजना गेम चेंजर मात्र मंत्र्यांची पलटी
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा ठरला. महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ, असेंआश्वासन देण्यात आले मात्र महायुतीतील मंत्रीच आता या आश्वासनाबाबत सातत्याने पलटी मारताना दिसून येत आहेत.


