एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
मृतांमध्ये संभाजीनगर, शिर्डीचे 1-1 विद्यार्थी
Three MBBS students drown to death चंद्रपूर (11 मे 2025) : पाण्याचा अंदाज न आल्याने गडचिरोली रुग्णालयातील एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी वैनगंगा नदीच्या पात्रात घडली. मृत तिघे हे बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी येथील रहिवासी असून प्रथम वर्षात शिकत होते.
सुटी बेतली जिवावर
शनिवारी सुटी असल्याने गडचिरोली येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणारे आठ विद्यार्थी वैनगंगा नदीमध्ये अंघोळीसाठी गेले होते. या वेळी नदी पात्रात पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी गोपाळ गणेश साखरे, (20, रा.चिखली, जि.बुलडाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (20, रा.शिर्डी, जि.अहिल्यानगर) आणि स्वप्नीलि उद्धवसिंग शिरे ( 20, रा. छत्रपती संभाजीनगर) तिघेजण पाण्यात बुडाले.
त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत सावलीचे पोलिस निरीक्षक प्रदीप पुरुलवार म्हणाले की, सायंकाळी सहा वाजताच्या ही घटना दरम्यान घडली असून रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, 26 फेब्रुवारी रोजी याच ठिकाणी चंद्रपुरातील तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.


