स्पाय कॅमेर्याच्या मदतीने पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीत करणार्या निलेश चव्हाण विरोधात गुन्हा
Crime against Nilesh Chavan for filming objectionable video of his wife with the help of spy camera पुणे (23 मे 2025) : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात पीडित कसपटे कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी नीलेश चव्हाण नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. आत्ता या तरुणानेही आपल्या पत्नीचा अमानुष छळ व तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे.
आरोपी निलेश वैष्णवीच्या पतीचा मित्र
नीलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे याचा मित्र आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका आहे. तो स्पाय कॅमेर्याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित करायचा. या प्रकरणी त्याच्यावर 2019 म्ध्ये पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता याच ठाण्यात नीलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेचे बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ केले रेकॉड
यासंबंधीच्या माहितीनुसार, नीलेश चव्हाणचे लग्न 3 जून 2018 रोजी झाले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये त्याच्या पत्नीला आपल्या बेडरुममधील सीलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याचा संशय आला. तिने याविषयी नीलेशला विचारले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पुढच्या फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पत्नीला घरातील एसीलाही काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी तिचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर तिने आपल्या पतीला म्हणजे नीलेश चव्हाणला त्याचा जाब विचारला.
त्यावर नीलेशने पुन्हा उडवा-उडवीची उत्तरे दिली. अखेर त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यात त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेर्याने रेकॉर्ड केल्याचे तिला आढळले. एवढेच नव्हे तर नीलेशचे इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओही तिच्या निदर्शनास आले. तिने या प्रकरणी नीलेशकडे विचारणा केली असता त्याने घरातील चाकू दाखवून तिला धमकावले. तिचा गळा दाबला. एवढेच नाही तर तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले.
वादात केला अनेकदा हस्तक्षेप
नीलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचा पोकलेन मशीनचाही व्यवसाय आहे. नीलेश चव्हाण हा मयत वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचीही माहिती आहे. शशांक व वैष्णवी यांच्यातील वादात अनेकदा त्याने हस्तक्षेप केल्याचीही माहिती आहे. कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत नीलेशच्या वडिलांचे 3 फ्लॅट आहेत.