राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणी याचिका दाखल करणार्‍या वकिलालाच दंड : काय म्हणाले न्या.गवई !


Fine for lawyer who filed petition in case of violation of royal etiquette नवी दिल्ली (23 मे 2025) : महाराष्ट्र दौर्‍यावर आलेल्या सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्या स्वागताचा प्रोटोकॉल न पाळल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी.आर. गवई चांगलेच संतापले. राईचा पर्वत केला, असे म्हणत सरन्यायाधीशांना वकिलाला सात हजारांचा दंडही ठोठावला.

याचिका फेटाळली, वकिलाला दंड
राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिका करणारे वकील सात वर्षांपासून वकिली करत आहेत त्यामुळे त्यांना सात हजारांचा दंड ठोठावत आहोत आणि हे प्रकरण आम्ही इथेच संपवत आहोत, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.

सरन्यायाधीश पहिल्यांदाच महाराष्ट्र दौर्‍यावर असताना महत्त्वाच्या पदावरील अधिकार्‍यांनी राजशिष्टाचाराचे पालन केले नाही. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

सरन्यायाधीश गवई म्हणाले, ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा प्रयत्न आहे. वर्तमानपत्रात नाव छापून यावे म्हणून ही याचिका केली गेली आहे. जर तुम्ही वकील आहात, तर तुम्हाला माहिती असले पाहिजे की, मी स्वतः स्पष्ट केले की, या क्षुल्लक गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका.

आम्ही इथे स्पष्ट करतो की, सरन्यायाधीशांना एक व्यक्ती म्हणून त्यांना दिलेल्या वागणुकीबद्दलची चिंता नाहीये तर लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या संस्थेचे प्रमुख म्हणून सरन्यायाधीश पदाची गरिमा राखली जावी म्हणून चिंता व्यक्त केली होती, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !