सिंहस्थळ कुंभमेळा : नाशिकमध्ये 2 ऑगस्टला पहिले अमृतस्थान
Simhasthala Kumbh Mela : First Amritsthan in Nashik on August 2 नाशिक (2 मे 2025) : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 ला, दुसरे 31 ऑगस्ट 2027 नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच दिवशी, तर नाशकातील पर्वणीचे तृतीय अमृतस्नान 11 सप्टेंबर 2027 रोजी, त्र्यंबकेश्वर पर्वणीतील तृतीय अमृतस्नान 12 सप्टेंबर 2027 ला होणार आहे.
नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची अमृतस्नान पर्वणीच्या तारखा निश्चितीसाठीची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 या दिवशी होणार असल्याने त्या दिवसापासून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. त्रिखंडी कुंभमेळा 22 महिने चालणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळा 13 महिन्यांचा असतो. मात्र, यंदा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्याने 22 महिने चालणार आहे. असा योग नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये 71 वर्षांनी येणार आहे.
नाशिकला आखाड्याचे ध्वजारोहण : 24 जुलै 2027
ध्वज अवतरणसह कुंभपर्वकाल समाप्ती : 24 जुलै 2028
दोन्ही ठिकाणच्या तीन पर्वण्यांव्यतिरिक्त नाशिकमध्ये एकूण : 44 मुहूर्त
त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण 53 मुहूर्त काढण्यात आले.
फडणवीसांच्या घोषणा
साधूग्राम अधिग्रहण : साधूग्रामसाठी जमीनीचे अधिग्रहण अंतिम टप्यात आहे. लवकरच त्यास मान्यता दिली जाईल.
कुशावर्तला पर्यायी जागा : चेंगराचेंगरी टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तला पर्यायी जागा शोधली जात आहे.
प्राधिकरण गठण लवकरच : प्रयागराजप्रमाणे प्रथमच महाराष्ट्रात स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे. लवकरच अध्यक्ष जाहीर करू.
शाही नव्हे आता अमृतस्नान : यापुढे सिंहस्थातील स्नानांना शाही नव्हे तर अमृत स्नान, अमृत कुंभ असेच म्हटले जाईल.
6,500 कोटींच्या निविदा : सुमारे चार हजार कोटींच्या निविदा काढण्यात आल्या तर आणखी 2 हजार 500 कोटींच्या निविदा काढू.
त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा : नाशिक-त्र्यंबक नव्हे तर त्र्यंबक-नाशिक अमृतपर्व असाच याचा उल्लेख होईल.