संत मुक्ताई पालखीचे 6 जून रोजी प्रस्थान


Sant Muktai Palkhi to depart on June 6 न्युज डेस्क । मुक्ताईनगर (2 जून 2025) : तापी काठावरून भीमा तिरावर जाणारा संत मुक्ताबाईंचा आषाढी वारी पालखी सोहळा 6 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. सहा जिल्ह्यांमधून 600 किमी पायी प्रवास आणि 28 ठिकाणी मुक्काम करून हा पालखी सोहळा 3 जुलै रौजी पंढरपुरात दाखल होईल. सजवलेला रथातून संत मुक्ताबाईच्या चांदीच्या पादुका या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असतील. दोन हजारांवर वारकरी सोहळ्यात सहभागी होतील, असा अंदाज आहे.

6 रोजी वारीचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास
रथ ओढण्यासाठी यंदाही नाचणखेडा (मध्य प्रदेश) येथील राजेश पाटील यांच्याकडून बैलजोडी उपलब्ध होणार आहे. संदीप भुसे (रा मरकळ, ता.खेड, जि. पुणे) यांचे दोन अश्व असतील. संत मुक्ताईंच्या आषाढी वारीचे यंदाचे 316 वे वर्ष आहे. कोथळी येथील संत मुक्ताईंच्या मूळ मंदिरातून 6 जूनला दुपारी 3 वाजता पालखी वारीचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू होईल.

नवीन मंदिरात पहिला मुक्काम
पहिलाच मुक्काम तीन किमी अंतरावरील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या नवीन मंदिरात होईल. 5 जून रोजी रात्री आठ वाजता कोथळी मंदिरात प्रस्थानपूर्व कीर्तन सोहळा होईल. उद्योजक विनोद सोनवणे (खामखेडा) अन्नदान करतील. 6 जून रोजी वारी प्रस्थान करून पहिला मुक्काम नवीन मंदिरात होईल. पुंडलिकराव पवार (चापोरा), प्रशांत महाजन (अंतुर्ली) हे अन्नदान करतील.

3 जुलैला पंढरपुरात प्रवेश
या दिवशी संत नामदेव महाराज आजेगुरू व संत मुक्ताई पालखी सोहळ्याची भेट होईल. संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान व पंढरपूर प्रवेश मुक्ताई मठ दत्त घाट येथे होईल. 5 जुलैला संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव व तुकाराम या संतांच्या पालखी सोहळा भेटी होतील.

पालखीचा रात्री मुक्काम असलेली गावे
मलकापूर, मोताळा, बुलडाणा, येळगाव, चिखली भरोसा फाटा, देऊळगाव मही, देऊळगाव राजा, कन्हैया नगर जालना, काजळा फाटा, अंबड, वडी गोद्री, गेवराई, पाडळसिंगी, नामलगाव फाटा, बीड माळवेस हनुमान मंदिर, बीड बालाजी मंदिर, पाली, वानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टी, पंढरपूर.

सहभागासाठी संपर्काचे आवाहन
सहभागासाठी व दिंड्यांच्या नोंदणीसाठी मुक्ताईनगर व कोथळी येथील मंदिरात संपर्क साधावा. परंपरेनुसार 6 जून रोजी वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याचे संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !