भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून आढावा
भुसावळ (3 जून 2025) : मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त सुरेन्द्र नाथ चौधरी यांनी आज भुसावळ विभागाचा दौरा करून रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यपद्धती व व्यवस्थांचा सखोल आढावा घेतला. सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
दौर्याची सुरुवात आरपीएफ जवानांच्या गार्ड ऑफ ऑनर ने झाली. त्यानंतर श्री. चौधरी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती पांडेय यांच्याशी सुरक्षा विषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी रेल्वे सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचारविनिमय झाला.
याच दौर्यादरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खंडवा येथील आरपीएफ बॅरक आणि शेगाव येथील आरपीएफ पोस्टचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या सुविधा आरपीएफ कर्मचार्यांसाठी निवास आणि कार्यस्थळी सुधारणा घडवून आणतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
चौधरी यांनी भुसावळ विभागातील आरपीएफ अधिकार्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावले आणि त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले.
या दौर्याच्या वेळी वरिष्ठ शाखाधिकारी, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, सहाय्यक सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफ निरीक्षक यांची उपस्थिती होती. भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला, असे मत उपस्थित अधिकार्यांनी व्यक्त केले.