भुसावळकर रसिक ‘गीत सरगम’ कार्यक्रमात मंत्रमुग्ध

प्रतिष्ठा महिला मंडळ व सप्तरंग मराठी चॅनलचा उपक्रम : मंत्री संजय सावकारेंच्या गीताला उत्स्फूर्त दाद


Bhusawalkar fans mesmerized by the ‘Geet Sargam’ program भुसावळ (9 जून 2025) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ व सप्तरंग मराठी चॅनलतर्फे मराठी व हिंदी सदाबहार गीतांचा ‘गीत सरगम’ हा कार्यक्रम शनिवार, 7 रोजी सायंकाळी सहा वाजता मातृभूमी चौकातील संतोषी माता सभागृहात झाला. यावेळी हिंदी व मराठी गीतांच्या सादरीकरणाने भुसावळकर रसिक मंत्रमुग्ध झाले. मंत्री संजय सावकारे यांच्या ‘ओ मेरे दिले के चैन’ या गीताने कार्यक्रमात रंगत आणली तर रसिक प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्यांची दाद देत या गीतासाठी वन्स मोअरची मागणीही केली. कार्यक्रमापूर्वी मुक्या प्राण्यांच्या पाण्यासाठी जलकुंड वाटप यावेळी करण्यात आले.

दुर्लक्षित बारा बलुतेदारांचा सहृदय सन्मान
बारा बलुतेदार ही महाराष्ट्रातील पारंपरिक आर्थिक व सामाजिक व्यवस्था असलीतरी या दुर्लक्षित घटकांची फारशी दखल घेतली जात नाही मात्र गीत सरगम या कार्यक्रमाचे औचित्य साधून शहरातील बारा बलुतेदार म्हणून ओळख असलेल्या कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मेहतर, न्हावी, परीट, गाडी लोहार, सुतार, हिंदू मांग, माळी, सोनार या घटकांचा मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. सन्मानार्थींमध्ये नामदेव किसन न्हावकर, रोवन एकनाथ सपकाळे, किशोर गुरव, सुधाकर जयकर, राजू खरारे, दत्तुअण्णा खोडे, पंडितराव ठाकरे, पुरूषोत्तम वसंत पवार, देविदास विठ्ठल शिरसाठ, बळवंत रामभाऊ ठोकळ, राजेंद्र जगदेव माळी, गोपाळ मधुकर विसपुते यांचा समावेश आहे.

मंत्री सावकारे यांच्या गीताला उत्स्फूर्त दाद
भुसावळचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे उत्तम लोकप्रतिनिधी सोबत गायकही आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक कार्यक्रमातून आपल्या मधूर आवाजातील गीताने शहरवासीयांना भुरळ घातली आहे. कार्यक्रम प्रसंगी त्यांनी ‘ओ मेरे दिले के चैन’ हे गीत गायन करीत उपस्थितांची मने जिंकली. अनेकांनी टाळ्या व शिट्या वाजवून त्यांच्या गीताला वन्स मोअरची मागणी केली. याप्रसंगी भुसावळातील नेत्र रोग तज्ज्ञ डॉ.नितीन दावलभक्त, संदीप जोशी यांनी गीताचे सादरीकरण करीत वाहवा मिळवली.

हिंदी-मराठी गीतांनी भुसावळकरांचे मनोरंजन
कार्यक्रमप्रसंगी गायक झाकीर खान, ऐश्वर्या परदेशी, मयूर मोरे, सुरभी गौड, विशाल वानखेडे आदींनी हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करीत भुसावळकरांचे मनोरंजन केले. अनेक गीतांना यावेळी रसिकांनी वन्स मोअरची दाद दिली. कार्यक्रमासाठी संतोषी माता सभागृह प्रेक्षकांनी अगदी खच्चून भरले होते.

यांची होती उपस्थिती
उद्योजक मनोज बियाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे भुसावळातील बियाणी एज्युकेशन संस्थेच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, कंत्राटदार मिलिंद अग्रवाल, सुधा अग्रवाल, विकास पाचपांडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, मुरलीधर पाटील, अभिलाष नागला, सुनीता पाचपांडे, राजर्षी कोलते यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तसेच मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची यावेळी माहिती दिली. सूत्रसंचालन उमा बागुल यांनी तर आभार सप्तरंगचे पंकज कासार यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !