भुसावळ पालिकेतर्फे मॄत प्राण्यांची विल्हेवाटीसाठीची सेवा बंद
नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास
Bhusawal Municipality suspends service for disposal of dead animals भुसावळ (11 जून 2025) : शहरात पालिकेच्या माध्यमातून मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती मात्र गेल्या काही दिवसांपासून ही सेवा ठप्प झाली आहे. यामुळे शहरात रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत मोकाट प्राणी मृत झाले तर नागरिकांना वैयक्तीक खर्च करुन विल्हेवाट लावावी लागत आहे.
सेवा सुरू करण्याची मागणी
नगरपालिकेने शहरात मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली होती. शहरात कोठेही कुत्रे, मांजर, डूक्कर आदींसह प्राणी मेले तर त्याची विल्हेवाट लावली जात होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र ही सुविधा पालिकेने बंद केली. यामुळे शहरातील अनेक भागांत मृत जनावरांना उचलण्यासाठी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भाजपचे शहर सरचिटणीस श्रेयस इंगळे यांनीही परिसरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेत संपर्क साधला मात्र कंत्राट संपल्याने हे काम करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शवली. यामुळे प्रशासनाने तत्काळ ही सेवा सुरू करावी, अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.