निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार : शरद पवार
पुणे (12 जून 2025) : निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे मोठे विधान शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार म्हणाले, 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जनतेचा प्रचंड मेळावा आणि पक्षाला उभारी आली. थोड्या दिवसातच महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकार्यांना सामान्य जनतेने संधी दिली. लोकांची सेवा करायची संधी दिली. सामान्य माणसाला संधी दिली तर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालवू शकतो. नावं घ्यायला अनेकांची नावं आहेत. जयंत पाटलांनी अर्थमंत्री म्हणून 10 वर्षं काम केलं आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवार यांच्याविषयी तसेच पक्षाच्या संघर्षाविषयी भाष्य केलं. त्यानंतर शरद पवारांनी पक्षातील नेतृत्व बदलावर देखील मोठे विधान केले आहे.
पुढे पक्षनेतृत्वावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, प्रमुख सहकार्यांना सोबत घेऊन चर्चा करणार. राष्ट्रवादी पक्षाने सामान्य माणसाला संधी दिली आहे. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच 50 टक्के महिलांना निवडून द्या, असे आवाहन देखील शरद पवारांनी केले आहे.
काही संकट आली, तर नाउमेद न होता पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षात फूट पडली. फूट पडेल असं कधी वाटत नव्हतं, पण पडली. मी याच्या संबंधी अधिक भाष्य करु इच्छित नाही. जे राहिले ते विचाराने राहिले. 1980 साली माझ्या हातात सत्ता नव्हती, त्याआधी होती. निवडणुका आल्या, 50 आमदार निवडून आले. सहा शिल्लक राहिले, बाकी पक्ष सोडून गेले. सहा राहिले त्यातले एक मला इथे दिसतायत कमल किशोर कदम. आमचा पक्ष सहा जणांवर आला. त्यानंतर पुन्हा निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या 72 झाली. राज्य सरकारमध्ये पुन्हा काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे चिंता करू नका. आपण एकसंध राहू. जनतेशी बांधिलकी ठेवायची आहे.