मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : शेतकर्‍यांना योग्य वेळी कर्जमाफी


Chief Minister Devendra Fadnavis assures: Loan waiver for farmers at the right time पुणे (21 जून 2025) : राज्यातील महायुती सरकारकडून योग्य वेळी शेतकर्‍यांना कर्ज माफीचा निर्णय घेतला जाईल व शब्द फिरवला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात शनिवारी आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.

पुणे विद्यापीठाचा पहिल्या 500 विद्यापीठांत समावेश होईल
पत्रकारांनी त्यांना पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, पण विभागांची स्थिती फारशी चांगली नाही, प्राध्यापकांचाही तुटवडा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, सर्वप्रथम मी पुणे विद्यापीठाचे मनापासून अभिनंदन करतो. जगातील पहिल्या 600 विद्यापीठांत आज पुणे विद्यापीठ आहे. मला अपेक्षा आहे की, पुढील वर्षी किंवा 2 वर्षांत पहिल्या 500 विद्यापीठांत आपली विद्यापीठे असतील.

पत्रकारांना सन्मानाने वागणूक
आळंदी संस्थानच्या विश्वस्तांनी आज पत्रकारांना हिनकस वागणूक दिली. त्याचे काही व्हिडिओ समोर आलेत. मुख्यमंत्र्यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. अनेकदा स्ट्रेस, तणावातून अशा गोष्टी घडतात. पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अशा संस्थांमधील नियुक्त्या सरकार करत नाही, तर त्या न्यायिक अधिकार्‍याच्या माध्यमातून होतात, असे ते म्हणाले.

आळंदीत कत्तलखाना होणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आळंदीतील कत्तलखान्याच्या प्रश्नावरही भाष्य केले. आळंदीच्या विकास आराखड्यातील एक आरक्षण कत्तलखान्यासाठी दाखवण्यात आले आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. मी स्वतः या कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिलेत. आळंदीत असे कोणतेही कृत्य होणार नाही याची हमी मी वारकरी संप्रदाय व वारकरी नेत्यांना देतो, असे ते म्हणाले.

सरकार योग्यवेळी कर्जमाफी देणार
सरकार शेतकरी कर्जमाफीचे आपले आश्वासन पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे ते म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले, सरकारचे सांगली व कोल्हापूरमधील पूरस्थितीवर लक्ष आहे. धरणांतून विसर्ग केव्हा सुरू करायचा व केव्हा बंद करायचा याचे नियोजन करण्यात आले आहे. शेजारच्या राज्यांशीही समन्वय ठेवला जात आहे. त्या राज्यांत आपला एक इंजिनिअर बसला आहे. पावसाळ्यात तो तिथेच असतो. त्याच्या माध्यमातून योग्य तो समन्वय साधला जात आहे. अर्थात निसर्गाचा भरवसा देता येत नाही. पण आपण आपल्या बाजूने पूर्ण नियोजन केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !