वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली
Valmik Karad’s health deteriorates in Beed jail बीड (22 जून 2025) : वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली असून तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कराडला शुगर आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तब्येतीत अधिक बिघाड झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे.
वाल्मीक कराडला कठोर शिक्षेची मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मीक कराड ओळखले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दबाव निर्माण झाला होता. अखेरीस त्यांनी प्रकृती कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, वाल्मीक कराडला कठोर शिक्षा व्हावी यासाठी या प्रकरणाचे वकीलपत्र प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
24 जून रोजी पुढील सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात 17 जून रोजी होणार होती. मात्र, न्यायाधीश रजेवर गेल्यामुळे ती सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील तारीख 24 जून निश्चित केली आहे. आता अवघ्या दोन दिवसांनंतर, मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.