जळगावातील महिलेवर धरणगावात नातवाकडून कुर्हाडीने हल्ला
Jalgaon woman attacked with axe by grandson in Dharangaon धरणगाव (27 जून 2025) : शेअर मार्केटमधील कर्जानंतर वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना धरणगाव शहरात गुरुवार, 26 जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. वृध्द महिला ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.
काय घडले धरणगावात
लिलाबाई रघुनाथ विसपुते (70, रा.महाबळ, जळगाव) या धरणगाव शहरात त्यांची मुलगी वैशाली विलास पोतदार यांच्याकडे बुधवार, 25 जून रोजी मुक्कामीसाठी गेल्या होत्या. वैशाली पोतदार यांचा लहान मुलगा संशयित आरोपी तेजस पोतदार हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. या गुंतवणुकीमुळे त्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज केले होते. तेजस एक वर्षापूर्वी जळगाव येथे मामाच्या घरी सहा महिने राहिला होता. त्यावेळी देखील काही लोक त्याच्याकडे पैशांच्या मागणीसाठी येत असत. यामुळे आजी लीलाबाई तेजसला नेहमी व्याजाने पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याबद्दल बोलत असत. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होता.





वादातून डोक्यात मारली कुर्हाड
गुरुवार, 26 जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तेजस आणि लिलाबाई यांच्यात शेअर मार्केटच्या कर्जावरून पुन्हा मोठा वाद झाला होता. त्यानंतर लीलाबाई बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेजस हा कुर्हाड घेवून आल्याचे त्यांचा भाऊ अक्षयने पाहिले होते. त्यावेळी मी पिंपळाचे झाड तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खाली निघून गेला. त्यानंतर अक्षय हा अभ्यास करण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. त्यावेळी तेजसने आजी झोपेत असतांना तिच्यावर कुर्हाडीने सपासप वार करून जखमी केले. बाजूलाच कुर्हाड ठेवली आणि भावाकडे पळत आला आणि आजीवर कुणीतरी कुर्हाडीने हल्ला केला असा बनाव केला. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडलेल्या वृध्द लिलाबाई यांना तातडीने रूग्णवाहिकेतून जळगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आरोपीला अटक
याप्रकरणी जखमी लिलाबाई यांच्या मुलाचा मुलगा उमेश धीरेंद्र विसपुते याने धरणगाव पोलिसात फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी तेजस विलास पोतदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धरणगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.
