सरकार दबावापुढे झुकणार नाही : महाराष्ट्राचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल ! मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई (30 जून 2025) : सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही व महाराष्ट्राचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला.
रवींद्र चव्हाण यांची निवड निश्चित
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. त्यांची या पदासाठी निवड जवळपास निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीच्या कथित सक्तीच्या मुद्यावर सरकार कुणापुढेही न झुकता विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल असे स्पष्ट केले.
मी काय दोघा भावांनी एकत्रीत न येण्याचा जीआर काढला का
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी काय दोन भावांनी एकत्रीत न येण्याचा जीआर काढला आहे काय? मी असा कोणताही जीआर काढला नाही. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता, त्या अहवालात त्यांचा उजवा हात मानला जाणार्या उपनेत्याने पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा असे लिहिले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्री मंडळ बैठकीत स्वीकारला. त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे घुमजाव केले. त्यानंतरही आम्ही कोणताही इगो न मानता त्यासंदर्भातील निर्णय केला आहे.
मी पुन्हा एकदा सांगतो. आम्ही निर्णय केला, आता समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य ते ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे पाहू. महाराष्ट्राचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही.
फडणवीस म्हणाले की, ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावी, टेनिस खेळावे, स्वीमिंग करावी, जेवण करावे आम्हाला काही अडचण नाही.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला केलेल्या विरोधाचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, हे दुटप्पी लोक आहेत. यांचे सत्तेतील रुप वेगळे असते व विरोधातील रुप वेगळे असते. खासगीत विचारले तर आणखी वेगळे रुप असते. त्यामुळे ते काय म्हणतात याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही.




