जळगावात पित्याच्या आत्महत्येनंतर कोल्हापूरच्या तरुणाने दिली फसवणुकीचा तक्रार : पाच जणांना अटक
Kolhapur youth files fraud complaint after father commits suicide in Jalgaon : Five arrested जळगाव (1 जुलै 2025) : जळगावात मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर लग्न झालेल्या कोल्हापूर येथील तरुणाकडूनही तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली.
असे आहे प्रकरण
हरिविठ्ठल नगरातील 41 वर्षीय इसमाच्या मुलीचे कोल्हापूर येथील 30 वर्षीय तरुणाशी लग्न लावून देण्यात आले व नंतर लग्नात दिलेले पैसे तसेच सोने परत देण्याचा तगादा लावल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार रविवार, 29 जून रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये संशयित सचिन दादाराव अडकमोल (रा.जळगाव) याला 29 जून रोजी तर मुलीचा पती आशीष सदाशिव गंगाधरे व त्याचा मामा आप्पासाहेब बजरंग गंगाधरे (दोन्ही रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) या दोघांना 30 जून रोजी अटक करण्यात आली.





नवरदेवाने दिली फसवणूक झाल्याची तक्रार
या प्रकरणात आता सदर मुलीचे ज्या तरुणाशी लग्न लावून दिले त्या आशीष सदाशिव गंगाधरे (30, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून मुलीसह मनीषा दिनेश जैन (38), सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री (पूर्ण नाव समजू शकले नाही) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अक्षय ठाकूर, मनीषा जैन यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात सोमवार, 30 जून रोजी पत्रकार परिषद झाली, त्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली. या वेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित उपस्थित होते.
आशीष गंगाधरे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर मुलगी, मनीषा दिनेश जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री यांनी लग्नाचा बनाव करून 3 फेब्रुवारी 2025 रोजी मुलगी दाखविण्यासाठी गावी आले व लग्नासाठी 2 लाख रुपये, 4 तोळे सोन्याचे दागिने द्यावे लागतील, असे सांगितले. स्थळ पसंत असल्याने एक लाख 95 हजार रुपये दिले. तसेच मुलीचे आई-वडिल नसल्याने तिच्या लग्नाची जबाबदारी आमच्यावर असल्याचे मीनाक्षी जैन यांनी सांगून सुजाता ठाकूर या मुलीच्या मावशी असल्याचे सांगितले.
3 फेब्रुवारी रोजी लग्न लावून दिले. लग्नात वराकडून चार तोळे सोन्याचे दागिनेही मुलीला देण्यात आले. लग्नानंतर सदर मुलगी जळगावात आली व 4 तोळ्याचे दागिने सुजाता ठाकूर यांच्याकडे देऊन आल्याचे सांगितले. त्यावेळी पती सोबत होता, त्याने तगादा लावून तिला परत नेले. नंतर एप्रिल 2025 मध्ये ती पुन्हा जळगावात आली व परत जाण्यास टाळाटाळ करू लागली. तिला पतीने घरी येण्यास सांगितले असता ती आली नाही व पैसे, दागिने परत मागितले असता तेदेखील दिले नाही.
मुलीला कॉल करून ती येत नव्हती व तिने मोबाईल बंद करून ठेवला. त्यामुळे आशीष गंगाधरे व आप्पासाहेब गंगाधरे हे 24 जून रोजी जळगावात मुलीच्या शोधात आले. त्यावेळी त्यांना मुलीचे आई-वडिल असल्याचे समजले व आपल्याला खोटी माहिती देण्यात आल्याचेही लक्षात आले. त्यांनी मुलीच्या घराचा शोध घेऊन तेथे गेले व तिच्या आईकडे विचारणा केली. त्यावेळी ज्यांनी लग्न लावून दिले, त्यांना विचारा असे आईने सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आशीष गंगाधरे यांनी रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान, आता दोन्हीबाजूने फिर्यादी दाखल झाली असल्याने खळबळ उडाली आहे.
