अनैतिक संबंधात पतीचा अडसर : प्रियकरासोबत महिलेने केले धक्कादायक कृत्य
बंगळुरू (1 जुलै 2025) : कर्नाटकातील तुमकुरू येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंध ठरणार्या पतीलाच महिलेने प्रियकराच्या मदतीने संपवले. प्रियकराच्या मदतीने पतीचा मृतदेह 30 किमी दूर अंतरावर फेकून देण्यात आला मात्र पोलिसांनी दोन आरोपींना अटक करीत गुन्हा निष्पन्न केला.
काय आहे नेमके प्रकरण
तुमकुरू जिल्ह्यातील तिप्तूर परिसरात मंगळवारी ही घटना घडली. शंकरमूर्ती नावाचा व्यक्ती एका फार्महाऊसवर एकटाच राहायला होता. त्याची पत्नी सुमंगला आणि प्रियकर नागराजू या दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. आपल्या प्रेमात पती शंकरमूर्तीचा अडथळा असल्याचे ते मानत होते.
सुमंगला तिप्तूरच्या कल्पतरू गर्ल्स हॉस्टेलमधील किचनमध्ये काम करायची. एकेदिवशी सुमंगलाने पती शंकरमूर्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्याला दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पायाने त्याचा गळा दाबला, यात शंकरमूर्तीचा मृत्यू झाला. हत्येनंतर प्रियकरासोबत मिळून शंकरमूर्तीचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळपास 30 किमी अंतरावर जात एका विहिरीत फेकून दिला.
पोलिसांनी या प्रकरणी शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा शंकरमूर्तीच्या बिछान्यावर मिरची पावडर आणि वस्तू विखुरलेल्या अवस्थेत सापडल्या. पोलिसांनी पत्नी सुमंगला हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा तिने उडवा-उडवीची उत्तरे दिली तेव्हा पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. खाकीचा धाक दाखवताच सुमंगलाने तिचा गुन्हा कबूल केला. सुमंगला आणि शंकरमूर्ती यांच्यात नागराजूसोबत असलेल्या नात्यावरून अनेकदा भांडण झाले होते.
दरम्यान, सहा महिन्यापूर्वी सुमंगला तिच्या पतीपासून वेगळी झाली होती. तिने तिच्या मुलीचे लग्नही न विचारता केले होते. त्यामुळे नाराज शंकरमूर्तीने तिला रागात जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सुमंगला आणि नागराजू या दोघांनी मिळून त्याचा काटा काढायचे ठरवले. शंकरमूर्तीच्या हत्येचं प्लॅनिंग बनवले आणि त्याला मारून टाकले. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दोघांना अटक केली.




