माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या भाषणाकडे लागले राजकीय धुरीणांचे लक्ष
कर्जमाफीवरून जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत सरकारवर केली होती टिका
भुसावळ : महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी येत असून आरपीडी रस्त्यावर डी.एस.ग्राऊंडच्या मैदानावर दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री जिल्ह्यासाठी काही दिलासादायक निर्णय जाहीर करणार का? यासोबत मंत्री पदापासून तीन वर्षांपासून लांब असलेल्या खडसे यांनी अनेकदा सरकारच्या कारभारावर टिकेची तोफ डागली असताना नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतही खडसेंनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर टिका केल्याने ते शुक्रवारी भुसावळच्या सभेतही काही बोलतात का? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या तीन सभा
शुक्रवार, 23 रोजी जळगाव जिल्ह्यात येत असलेल्य मुख्यमंत्र्यांच्या जळगावसह भुसावळ व जामनेर अशा तीन ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. महाजनादेश यात्रा 23 रोजी सकाळी 11.30 वाजता अमळनेर येथे व दुपारी 12.30 वाजता धरणगाव येथे पोहचेल. या दोन्ही ठिकाणी यात्रेचे स्वागत होईल. यानंतर ही यात्रा जळगाव येथे पोहोचणार आहे.