भुसावळातील हॉटेल व्यावसायिकावर हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


Attack on hotelier in Bhusawal : Case registered against four भुसावळ (2 जुलै 2025) : भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील चौघा तरुणांनी भुसावळ येथील हॉटेल व्यावसायिकावर जुन्या वादातून हल्ला करत शिवीगाळ, दमदाटी व मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यावसायिक अनिकेत अमृत गुंजाळ (25, रा. कन्हैयालाल प्लॉट, वांजोळा रोड, भुसावळ) यांनी तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके
22 जून रोजी रात्री 10.30 ते 11.15 दरम्यान अनिकेत गुंजाळ आणि त्याचा लहान भाऊ अनुराग हे हॉटेल बंद करून चोरवड येथून परत भुसावळला येत होते. आयटीआय समोर त्यांची मोपेड ( एमएच 19 ईसी 6395) अडवून भुषण संजय पाटील व जितेंद्र संजय पाटील (दोघे रा. चोरवड) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला. जितेंद्र पाटील याने मुरुमाचा दगड फेकून मारला तर भुषण पाटील याने अनुरागला गाडीवरून खेचण्याचा प्रयत्न करत त्याचा मोबाइल हिसकावून घेतला.यावेळी अनुरागच्या अंगावरील शर्टही फाटला.









या प्रकारानंतरही संजय रामसिंग पाटील आणि मनोज विजयसिंग पाटील (दोघेही रा. चोरवड) यांनी समोरून येत अनिकेत व अनुराग यांच्यावर दगडफेक करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दोन्ही जणांनी कशीतरी गाडी चालवून नहाटा चौफुली गाठली आणि नंतर नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक चौकशीअंती अनिकेत गुंजाळ यांनी 29 जून रोजी आपल्या काकांसोबत पोलीस स्टेशन गाठून चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भुषण संजय पाटील, जितेंद्र संजय पाटील, संजय रामसिंग पाटील आणि मनोज विजयसिंग पाटील (सर्व रा. चोरवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !