भुसावळ तहसीलदारांची मोठी कारवाई : सहा डंपरसह जेसीबी जप्त
अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी डंपर, जेसीबीधारकांना अडीच लाखांचा दंड

Big action by Bhusawal Tehsildar : JCB along with six dumpers seized भुसावळ (2 जुलै 2025) : भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांनी पथकासह छापेमारी करीत अवैधरित्या मुरूम उत्खनन करताना सहा डंपरसह जेसीबी जप्त केला होता. या कारवाईनंतर मंगळवारी संबंधित डंपरधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या. महसूल विभागाने वाघूर नदी परिसरात छापा टाकल्यानंतर गौण खनिज माफिया हादरले आहेत.
दंडाच्या नोटीसीने खळबळ
मंगळवारी देविदास कोळी, सागर कोळी, वैभव कोळी, भरत धनगर, ईश्वर कोळी, कोमल सपकाळे आणि तुषार कोळी यांच्यासह अन्य संबंधितांना तहसील कार्यालयातून नोटिसा बजावण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या 6 डंपरचालकांना प्रत्येकी 2 लाख 50 हजार रुपयांचा दंड, तर जेसीबीच्या मालकाला सुमारे सात लाख रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे.

तहसीलदार लबडे यांनी ही नोटीस बजावल्यानंतर संपूर्ण कारवाईचा प्रस्ताव पुढील वैधानिक कार्यवाहीसाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवाईनंतर खनिज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पर्यावरणाची हानी रोखणे, शासन महसुलाची गळती थांबवणे आणि अवैध उत्खननाला आळा घालणे या उद्देशाने प्रशासनाने अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. भविष्यात कोणतीही परवानगी न घेता खनिज उत्खनन करणार्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
