सुटीचा आनंद लुटण्यासाठी निंबादेवी धरणावर आले मात्र मात्र जळगावातील तरुणासोबत विपरीत घडले

यावल (2 जुलै 2025) : यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात जळगाव येथील रामेश्वर कॉलनीतील 18 वर्षीय तरुण रविवारी सायंकाळी पाच वाजता बुडून बेपत्ता झाला होता. दोन दिवस त्याचा शोध घेण्यात आला मात्र तरुणाचा मृतदेह मिळून आला नव्हता. मंगळवारी सकाळी 9 वाजता धरणात तरुणाचा मृतदेह तरंगतांना आढळला. धरण क्षेत्रातून ट्रॅक्टरव्दारे व पुढे शववाहिकेव्दारे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांना सोपवण्यात आला.
काय घडले नेमके
सावखेडासीम येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. या धरणावर जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील आठ तरुण दुचाकी वाहनाव्दारे रविवारी सुटीची मौजमजा करण्याकरीता आले होते. यात रविवारी सायंकाळी पाच वाजेला जतीन अतुल वार्डे (18ा रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा अचानक खोल पाण्यात गेला आणी बुडून बेपत्ता झाला होता.

रविवारी व सोमवारी असे दोन दिवस पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सावखेडासीम पोलीस पाटील पंकज बडगुजर, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार वासुदेव मराठे, अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील या पथकाकडून त्याचा शोध घेण्यात आला मात्र तरुणाचा मृतदेह मिळून आला नव्हता तर मंगळवारी सकाळी नऊ वाजेला त्याचा मृतदेह हा धरणात तरंगतांना दिसून आला. तातडीने तेथुन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. येथे डॉक्टरांनी शवविच्छेदन करीत मृतदेह मयताच्या कुटुंबीयास सोपवला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
