अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती जिवंत परतला : पाळधीतील घटना

Dead person returns alive while preparations for funeral are underway: Incident in Paladhi पाळधी (6 जुलै 2025) : पाळधी गावातील प्रौढ बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा चार दिवसांपासून शोध सुरू असताना रेल्वे रूळावर मृतदेह आढळला तो बेपत्ता असलेल्या पाळधीतील प्रौढाचाच असल्याचे समजून अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली, नातेवाईक जमले, रडारड सुरू झाली मात्र अंत्ययात्रा निघणार तोच मात्र तोच रघुनाथ वामन खैरनार (65, रा.पाळधी, ता.धरणगाव) हे इथे बसले असल्याचो फोन खणाणला व प्रत्यक्षात खातरजमा केल्यानंतर ज्यांना मृत समजत होतो ते जिवंत असल्याचा प्रत्ययही आला. दुखःवेगाचे वातावरण क्षणात बदलून नेमका काय चमत्कार घडला हा सर्वांनाच प्रश्न पडला.
काय घडले पाळधीच्या प्रौढासोबत
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी रघुनाथ खैरनार हे घरी कोणाला काहीही न सांगता गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरून निघून गेले. बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत असताना शनिवार, 5 जुलै रोजी सकाळी पाळधी गावाजवळच रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला. ही माहिती गावात पसरताच गावकर्यांसह बेपत्ता वृद्धाचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले.
चेहरा अस्पष्ट असल्याने संभ्रम वाढला
घटनास्थळी पोलिसही आले. पण आत्महत्या करणार्या माणसाचा चेहराच नष्ट झाल्यामुळे हा माणूस कोण आहे, हे मात्र कळत नव्हते. पाळधीतील मिलिंद भालेराव यांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले, हा तर आमचा रघुनाथ खैरनार. रघुनाथ खैरनारांच्या घरी बातमी पोहोचली. रडारड सुरू झाली. त्यांचा मुलगा पुण्यात असतो. त्यालाही फोन करून बोलावण्यात आले. मृतदेह तिथून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घरी तिरडी आणली गेली, अंत्यसंस्कारासाठी लागणारा सामानही आणला गेला.
एका फोनने बदलले वातावरण
मुलगाही पोहोचला. अंत्ययात्रेसाठी मृतदेह घरी पोहोचणार, तेवढ्यात ‘रघुनाथ खैरनार तर इथे बसले आहेत’, असे सांगणारा फोन आला. खरे तर आत्महत्या – करणारी व्यक्ती होती पथराड येथील ज्ञानेश्वर अर्जुन पाटील. त्यांचेही वय – 55 व अंगकाठी, कपडेही रघुनाथ खैरनार घालतात तसेच. तेही सकाळपासून घरून बेपत्ता झाले होते व त्यांचे कुटुंबीय त्यांचा पथराड परिसरात शोध घेत होते. पण त्यांनी आत्महत्या केली असेल, याची त्यांना कल्पना आली नाही.
अन् नातेवाईकांचे चेहरे खुलले
पोलिसही रघुनाथ खैरनार म्हणूनच त्यांचा मृतदेह हाताळत राहिले. शवविच्छेदन झाले तेही त्याच नावाने. मृतदेह पांढर्या कपड्यात गुंडाळण्यात आला व तो पाळधीकडे रवानाही करण्यात आला. पण मुलगा पुण्याहून घरी पोहोचायचा होता त्यामुळे शववाहिनी पाळधीच्या पेट्रोल पंपाजवळच थांबवून ठेवण्यात आली होती. मुलगा सायंकाळी घरी पोहोचला आणि तेवढ्यात गावातील एकाचा फोन आला, ‘रघुनाथ तर इथे बसला आहे’. सांगणारा खरेच सांगत होता; पण विश्वास कोण ठेवणार? खात्री करण्यासाठी व्हिडिओ कॉल करायला सांगण्यात आले. त्यांनी केलाही. पलीकडे बसलेले रघुनाथ खैरनार हात हलवून आपण जिवंत असल्याचे सांगत होते. एका क्षणात वातावरण बदलले. यामुळे नातेवाईक, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला व दुसरीकडे बाबांना जिवंत पाहून आनंदही गगनात मावेनासा झाला. सर्व हकीकत समजल्यानंतर पाळधी पोलिसांना कळवून तो मृतदेह रुग्णालयात परत नेण्यात आला.
