मंत्री नरहरी झिरवळ आमदारांनाच दोन वेळा म्हणाले मंत्री महोदय ; काय घडले विधानसभेत !

Minister Narahari Zirwal मुंबई (7 जुलै 2025) : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना आपण स्वतःच मंत्री असल्याचा विसर पडला व आमदार आमश्या पाडवी (अक्कलकुवा) यांना ते दोनवेळा मंत्री महोदय म्हणाले. त्यांचे हे शब्द ऐकताच सभागृहात एकच खसखस पिकली.
काय घडले सभागृहात
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी अन् विरोधकांत जोरदार खडाजंगी पहावयास मिळत आहे. पण त्याचवेळी काही हलके – फुलके प्रसंगही घडत आहेत. सोमवारी अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी आपल्या मतदारसंघातील तेलाच्या भेसळीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, अक्कलकुवा तालुक्यात सध्या फॅक्टरीत टँकर लावून तेलात भेसळ केली जात आहे. नंदुरबार हा पूर्णतः आदिवासी जिल्हा आहे. मी ज्या मतदारसंघात राहतो, तो 100 टक्के आदिवासी आहे. तिथे हे भेसळयुक्त तेल दिले जात आहे. यामुळे या भागातील काही लोकांना कॅन्सर झाला असून, काहींना इतर गंभीर आजार झालेत.
मी या प्रकरणी यापूर्वीही तक्रार केली होती. त्यानंतर 25 लाखांचा माल जप्त करण्यात आला होता. पण काही दिवसांत पुन्हा भेसळयुक्त तेलाची विक्री सुरू झाली. तेल भेसळ करणारा व्यक्ती आमच्या आदिवासी बांधवांना आजारी पाडत आहे. त्याच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न पाडवी यांनी केला.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून नरहरी झिरवळ यांनी त्याला उत्तर दिले. पण त्यात त्यांनी आमश्या पाडवी यांचा दोनदा मंत्री महोदय म्हणून उल्लेख केला. यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली. झिरवाळ पहिल्यांदा ‘मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न खरा आहे’, असे म्हणाले. त्यावर आमदारांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी सॉरी म्हणत चूक उमगल्याचे सांगितले. पण त्यानंतर पुन्हा ते म्हणाले, ’अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न…’ असे म्हणताच पुन्हा सदस्यांनी गलका केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिश्किल टिप्पणी करत त्यांना भूमिकेत जायला थोडा वेळ द्याल की नाही? असा प्रश्न गदारोळ करणार्या आमदारांना केला. त्यावर आमदारांनी त्यांना हसून दाद दिली.
ती कंपनी बंद करणार
आमदार पाडवी यांच्या मतदारसंघात मे. गोपाल प्रोव्हिजन नावाने एक कंपनी आहे. ती तेलाचे उत्पादन करते. या कंपनीच्या अनेकदा चौकशा झाल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यात काही ना काही भेसळ निघाली आहे. कंपनीतून घेतलेले नमुने कमी दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कंपनीच्या मालकाविरोधात आपल्याकडेच नव्हे तर गुजरातमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. प्रशासनाने ते नमुने तपासणीसाठी पाठवलेत. त्याचा अहवाल आल्यानंतर ही कंपनी तत्काळ बंद केली जाईल, असे झिरवळ प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
