मंत्र्यांचा तोल घसरला : ठाकरेंच्या आमदारांना म्हणाले, गद्दार कुणाला म्हणतो रे, बाहेर ये तुला सांगतो, तुझ्या आयला !
The ministers lost their balance : They told Thackeray’s MLAs, “Who are you calling a traitor? Come out and tell me, I’ll come to you!” मुंबई (10 जुलै 2025) : कॅन्टीनमधील खाद्यावरून आमदाराने कॅन्टीनमध्ये राडा केल्याची घटना ताजी असतानाच मंत्री शंभूराज देसाई यांनी अपशब्दाचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला.
काय घडले सभागृहात
राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अर्थात विधान परिषदेत आज मराठी माणसाच्या मुद्यावर अनिल परब – शंभूराज देसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी अनिल परब यांनी देसाई यांचा उल्लेख गद्दार म्हणून केला. त्यावर देसाई यांचा तोल ढळला. गद्दार कुणाला म्हणतो रे, बाहेर ये तुला सांगतो, तुझ्या आयला, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. परिणामी, उपसभापती नीलम गोर्हे यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित केले.
मराठी माणसाला मिळावे प्राधान्य
विधान परिषदेत आज मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा उपस्थित झाला. या चर्चेत हस्तक्षेप करताना अनिल परब यांनी मराठी माणसांना विविध प्रकल्पांत 40 टक्के घर प्राधान्याने देण्यासंबंधी कायदा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, सभागृहातील सदस्यांचा एकंदरीत सूर मराठी माणसांविषयी कायदा आहे की नाही? असा आहे. आपण म्हणता कायदा नाही, पण मराठी माणसाला प्राधान्य मिळाले पाहिजे. मराठी माणसाला प्राधान्य मिळाले पाहिजे हे आपण कोणत्या आधारावर सांगता? ही मराठीची इच्छा सांगता आपण. हा कायदा आहे का? मराठी माणसांना प्राधान्याने घर मिळाले पाहिजे हा कायदा आहे का? नाही. सरकारची इच्छा आहे, मराठी माणसांची इच्छा आहे की कायदा करा. आमचेही तेच म्हणणे आहे की, कायदा करा. जर तुम्ही पीएपी साठी कायदा करा, तुम्ही घरे ताब्यात घेता, तुम्ही बाकीच्या शेड्यूल्ट कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब हे ते सगळे आता वाचून दाखवले, त्याच्यात तुम्ही घरे अॅक्वायर करता.
ठाकरे सरकारने असा कायदा केला का? देसाई
मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हे सरकार मराठी माणसांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. आत्ता अनिल परब हे ज्या पद्धतीने रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील किंवा म्हाडाचे प्रकल्प असतील, एसआरएचे किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन कोणत्याही योजनांमधील प्रकल्प असतील, या संदर्भात ज्या पोटतिडकीने मराठी माणसांसाठी भूमिका मांडत आहेत, तीच भूमिका या सदनाची आहे. तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे. पण 2019 ते 2022 या काळातील सरकारमध्ये अशा प्रकारचे धोरण तुम्ही घेतले होते का? अशा पद्धतीचे नियम तुम्ही केले होते का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? असे प्रश्न यापूर्वी काही सदस्यांनी विचारले होते. त्याला मी असा कायदा झाला नव्हता असे उत्तर दिले होते.
शंभूराज देसाई यांच्या या विधानावर अनिल परब यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. या गोंधळातच मंत्री देसाई पुढे म्हणाले, तुम्ही केले नाही. हे रेकॉर्डवर येत आहे, हे तुम्हाला ऐकवत नाही का? अरे तुम्ही केले नाही, तुम्ही करू शकला नाही याचा अर्थ तुमचे मराठीचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे. अध्यक्षा महोदया याला एवढे झोंबायचे काय कारण आहे? कशासाठी? तु्म्ही स्वीकारा तुम्ही काहीच केले नाही. तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा की तुमचे मराठी माणसांबद्दलचे प्रेम किती खरे आहे आणि किती वरवरचे आहे.
याचवेळी अनिल परब यांनी शंभूराज देसाई यांचा उल्लेख गद्दार असा केला. त्यावर देसाई चांगलेच भडकले. काय गद्दारी सांगतो. कुणाला म्हणतो गद्दार. बाहेर ये तुला दाखवतो. आयला. गद्दार कुणाला म्हणतो रे, असे ते म्हणाले. त्यानंतर गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपसभापती नीलम गोर्हे यांनी लगेचच सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित केले. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने ऑनलाईन दिले आहे.




