नाशिकमधील ‘गोदावरी’ने ओलांडली धोक्याची पातळी
नाशिक – शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून दर तासाला तीन हजार क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग केला जात आहे. रविवार सकाळच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून सकाळी साडे 9 वाजता 23 हजार 445 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू गेला. तसेच होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग 30 हजार क्युसेकपेक्षा अधिक असून धोक्याची पातळीच्या अधिक वर गोदावरी वाहू लागली आहे.
नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहोचले
नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहोचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला. महापुराचे संकेत देणार्या नारोशंकर मंदिराच्या घंटेला पाणी लागण्याची शक्यता आहे. कारण या मंदिराचे छत पाण्याखाली गेले असून केवळ घंटा आणि कळस नजरेस पडत आहे. विसर्गात वाढ झाल्यास आणि शहरात पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास घंटेपर्यंत पुर पातळी पोहचू शकते. तसे झाल्यास गोदावरीला महापूर येईल. गाडगे महाराज पुलाच्या खाली पाणी लागल्याची माहिती आहे. याठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी गर्दी करणार्या नाशिककरांना सावधानतेचा इशारा देत आहेत.