महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा प्रकार संवेदनशीलतेच्या अभावाचा कळस : वैशाली विसपुते
Vaishali Vispute जळगाव (11 जुलै 2025) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आर.एस. दमानी शाळेत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. मासिक पाळीविषयी असलेल्या सामाजिक अज्ञानाचा आणि संवेदनशीलतेच्या अभावाचा कळस आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळल्यावर 10 ते 12 वर्षांच्या मुलींना विवस्त्र करून तपासणी करण्याचा क्रूर आणि अमानवीय प्रकार समोर आला आहे. अशा कृत्याने मुलींच्या मनावर आणि त्यांच्या आत्मसन्मानावर आघात होतो, जो कधीही भरून न येणारा असल्याचे मत जळगावातील निधी फाउंडेशनच्या संचालिका सौ.वैशाली विसपुते यांनी व्यक्त केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील गंभीर त्रृटी समोर
निधी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मासिक पाळीविषयी जनजागृती आणि शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी लज्जास्पद किंवा अपमानास्पद नसावी. शाळा ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण देणारी जागा असायला हवी, परंतु अशा घटनांमुळे शिक्षण क्षेत्रातील गंभीर त्रुटी समोर येतात.





या प्रकरणातील मुख्याध्यापिका आणि कर्मचार्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई झाली असली, तरी हे प्रकरण केवळ कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित राहता कामा नये. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि मासिक पाळीविषयी संवेदनशील दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाला याबाबत प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून मुलींना अशा अमानवीय अनुभवांना सामोरे जावे लागणार नाही.
मी या घटनेचा तीव्र निषेध करते. मासिक पाळीविषयी जागरूकता आणि सन्मान वाढवण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू. मुलींना त्यांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा अनुभव मिळाला पाहिजे, त्यांना अपमान आणि भय यांचा सामना करावा लागता कामा नये, सौ.वैशाली विसपुते म्हणाल्या.
