जयंत पाटील यांचा अखेर राजीनामा : शशिकांत शिंदे नूतन प्रदेशाध्यक्ष
Jayant Patil finally resigns : Shashikant Shinde is the new state president मुंबई (15 जुलै 2025) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी अखेर पदाचा राजीनामा दिला व नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी जयंत पाटील भावूक होवून म्हणाले की, विधानसभेला आपण खूप ताकद लावली परंतु यश मिळाले नाही. आता बिहारमध्ये सगळी मतदार यादी नव्याने करत आहेत. 35 लाख मतदार यांनी बाद केले, असे प्रत्येक राज्यात केल जाईल. आता हे विविध राज्यात होईल, असा संभाव्य धोकाही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील यांचा राजीनामा
राजीनामा देण्यापूर्वी जयंत पाटील यांनी भावनिक होत गेल्या सात वर्षांच्या आपल्या कार्याचा आढावा आणि पक्षासाठी घेतलेल्या मेहनतीची माहिती दिली. मला शरद पवारांनी अध्यक्षपदाची संधी दोनदा दिली. सात वर्षे काम करत असताना एकदाही सुट्टी घेतली नाही. तसेच, बायकोलाही मी हे सांगितले, असे जयंत पाटील म्हणाले.





आपल्या भाषणाची सुरुवात करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर, त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सातार्यातील पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीचा उल्लेख करत, शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यावर आता उत्तरेकडील प्रभाव दिसून येत असल्याचे ते म्हणाले. तसेच, हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रयत्नांवरून आणि मुंबई महापालिका निवडणुकीत विशिष्ट समाजाला खुश करण्याच्या कथित प्रयत्नांवरून त्यांनी सरकारला घेरले.
टोपेंच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त
जयंत पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत पक्षाने लढलेल्या निवडणुकांची आठवण करून दिली. आमच्याकडे दोन अमोल होते. अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी. त्यापैकी मिटकरी तिकडे गेले, पण आम्ही 54 जागा जिंकल्या, 17% मते मिळाली. त्यावेळी सत्ता आली आणि कोव्हिड आला. राजेश टोपे यांचे काम कुणीही विसरणार नाही. पण, मतदारसंघांतील लोक कसे विसरले माहिती नाही, असे म्हणत टोपे यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली.
पक्ष फुटला, पण आम्ही पॅनिक झालो नाही
जयंत पाटील पुढे म्हणाले, मधल्या काळात पक्ष फुटला, आम्ही त्यावेळी पॅनिक न होता जागेवर राहण्याचा निर्णय घेतला आणि अपात्रतेची कारवाई करण्याबाबत आम्ही त्याचरात्री विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव दिला. लोकसभेला आपल्याला प्रचंड यश मिळाले. इथे बसलेले 8 खासदार हे शरद पवार यांच्या कष्टाचे फळ आहे. शरद पवार यांनी प्रचंड काम केले. निवडणूक आयोगाकडून उलटा निकाल त्यामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड नाराज झाली. जनतेने आपल्याला साथ दिली. आपण लोकसभेला 10 जागा लढवल्या आणि प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे निवडणुकीत आठ खासदार आपले निवडून आले, अशी आठवण जयंत पाटील यांनी सांगितले.
