एमआयडीसी पोलिसांची कारवाई : सराईत गुन्हेगार ‘खेकड्या’ला अटक
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोर्या उघडकीस येण्याची शक्यता

MIDC police action : Innkeeper criminal ‘Khekdya’ arrested जळगाव (17 जुलै 2025) : शहरातील कांद्याच्या व्यापार्याला चाकूचा धाक दाखवून रोकड लुटून दहशत निर्माण करणार्या अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीद या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार, 15 जुलै रोजी रात्री 11 वाजता मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीला न्यायालयाने 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 12 जुलै रोजी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास सय्यद फैय्याज गयासुद्दीन (52, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे ममता बेकरीकडून सुप्रीम कॉलनीकडे पायी जात होते. हुसैनी चौकात अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीद (रा. सुप्रीम कॉलनी) याने त्यांचा रस्ता अडवला. चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या शर्टाच्या खिशातील 14 हजार 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेनंतर सय्यद फैय्याज गयासुद्दीन यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

खेकडा अडकला अखेर जाळ्यात
एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे आणि राहुल घेटे यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. 15 जुलै रोजी रात्री 11 वाजता ‘खेकडा’ हा अजिंठा चौफुली परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. तत्काळ पथकाने घटनास्थळी धाव घेत अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीदला अटक केली.
