फैजपूरात भाजपच्या माजी नगराध्यक्षांची दादागिरी : दालनाचा दरवाजा बंद ठेवल्यास लाथेने तोडण्याची प्रांतांना धमकी

Former BJP mayor’s bullying in Faizpur : Threatens to break down the hall door with a hammer if it is kept closed फैजपूर (18 जुलै 2025) :फैजपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनाचा दरवाजा बंद दिसल्यास तो लाथ मारून तोडेल, अशी धमकीच फैजपूर येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांनी प्रांतांना दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंत संतप्त झालेल्या यावल, रावेर तहसीलमधील कर्मचार्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केले तर फैजपूर प्रांत कार्यालयात एकत्र घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी जळगाव न जिल्हाधिकार्यांची भेट घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
काय आहे नेमके प्रकरण
16 जुलै रोजी नीलेश राणे हे परवानगी न घेताच प्रांत बबन काकडे यांच्या दालनात आले. तेथे मोबाईलमधून व्हीडिओ चित्रीकरण करताना अरेरावी व अर्वाच्च भाषेचा वापर केला. दालनाचा दरवाजा बंद राहत असल्याबाबत विचारण केली. प्रांत काकडेंनी त्यांना ऑनलाइन मिटिंग, व्हीसी असल्याने दरवाजा बंद ठेवावा लागतो, असे सांगताच तीळपापड झालेल्या राणेंनी, यापुढे दालनाचा दरवाजा बंद दिसल्यास तो लाथेने तोडून टाकेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

कर्मचारी संतप्त : काम बंद आंदोलन
या प्रकारानंतर यावल, रावेर तालुका व फैजपूर भाग महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिले. तत्पूर्वी महसूल कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी प्रांत बबनराव काकडे यांची भेट घेतली.
राणेंविरोधात हवी कारवाई
नीलेश राणे हे वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जावून तेथील अधिकारी, कर्मचार्यांना वेठीस धरतात. मोबाइलने चित्रफित बनवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारींच्या धमक्या देतात. यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचार्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. राणेंवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने निवेदनातून दिला.
तक्रारीबाबत केली विचारणा
एक वर्षापासून मधुकर सहकारी साखर कारखान्यातील अवैध गौणखनिज उत्खननाची तक्रार प्रांत कार्यालयात केली आहे. त्याबाबत विचारण्यासाठी व माहिती अधिकारातील माहिती घेण्यासाठी प्रांत कार्यालयात गेलो असल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले.
